फोंडा गोवा येथील पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

पू. (श्रीमती) सुमन नाईक

आज आपण फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्याविषयी साधिकेने अनुभवलेले भावक्षण येथे पाहूया.     

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/493013.html 

सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक म्हणजे प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता यांचा अनोखा संगम आहे. त्यांच्यातील सहजता या गुणामुळे त्या सर्वांना सहजतेने आपलेसे करून घेतात. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, याची त्यांना पुष्कळ तळमळ आहे. त्या साधकांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात आणि वेळोवेळी तत्त्वनिष्ठतेने त्यांच्या चुकाही लक्षात आणून देतात. सध्या त्या साधकांसाठी नामजपादी उपाय करतात.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्या संतांच्या संदर्भात येत असलेल्या लेखांमुळे ‘पुढे मी नसेन, तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर होऊन मी निश्चिंत झालो !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या अनेक संतांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले लेख काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांत संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विषय वाचून ‘पुढे मी नसेन तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर झाली आहे. उलट मला वाटले, ‘मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठेच जाऊन साधकांना भेटू शकत नाही. याउलट सनातनचे संत साधकांना नियमितपणे भेटतात. या भेटींमुळे साधकांची प्रगती जलद होत आहे, तसेच संस्थेचे कार्यही झपाट्याने वाढत आहे.’ यामुळे मला आनंद झाला !

या आपत्काळातही सनातनच्या साधकांना संतांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे साधनेत लाभ होत आहे. सनातनची शिकवण अशीच पुढे वृद्धींगत होऊन साधक साधनेत पुढे पुढे जाणार आहेत आणि हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. यासाठी मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आणि देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. सानिका सोनीकर

१. मनात समष्टी संतांची सेवा करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे आणि त्यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये अन्

पू. (श्रीमती) सुमन नाईक यांची सेवा करण्याची संधी मिळणे

‘मी पूर्वी सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहात होते. तेव्हा माझ्या मनात ‘समष्टी संतांच्या सहवासात रहाण्यासाठी त्यांच्या सेवेची संधी मिळावी’, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. त्या वेळी मला सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या सेवेची संधी मिळाली आणि नंतर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मला पू. सुमनमावशींच्या (पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्या) सेवेची संधी मिळाली. मी सेवेत परिपूर्ण नसूनही मला समष्टी संतांच्या सेवेची संधी मिळाली. त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. पू. सुमनमावशींच्या सेवेतून अनुभवलेला आनंद !

२ अ. पू. सुमनमावशींच्या सेवेतून आनंद मिळणे आणि त्यांचा सत्संग मिळाल्यावर भावजागृती होणे : पू. सुमनमावशींच्या सेवेच्या पहिल्या दिवशी त्यांची सेवा करतांना मला आतून आपोआप उत्साह वाटू लागला आणि माझ्याकडून सेवा आनंदाने होऊ लागली. त्यांची सेवा करतांना मला नेहमीपेक्षा पुष्कळ आनंद मिळू लागला. देवाच्या कृपेने सेवा झाल्यावर मला त्यांचा १ – २ मिनिटांचा सत्संग मिळाला. त्या वेळी माझा भाव जागृत झाला. त्यांच्या खोलीतून बाहेर आल्यावर मला त्याची जाणीव झाली. सहसा माझी भावजागृती होत नाही; पण ‘परात्पर गुरुदेवांनी माझी भावजागृती करवून घेतली’, असे मला वाटले.

२ आ. पू. मावशींनी नातीप्रमाणे प्रेम करणे : पू. मावशी इतरांचा पुष्कळ विचार करतात. त्या मला त्यांच्या नातीसमान समजतात. त्या मला ‘सानिका’ या नावाने हाक न मारता ‘गुणवंती’ या नावाने हाक मारतात. एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘किती गं माझी नात माझ्यासाठी जिन्यावरून वर-खाली करते !’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. प्रतिदिन त्या मला विचारतात, ‘‘तुझा अल्पाहार झाला का ? महाप्रसाद झाला का ?’’ खरचं ! देव माझी पुष्कळ काळजी घेतो, तरीसुद्धा मी त्याच्या सेवेत न्यून पडते.

२ इ. ‘संतांची सेवा भावपूर्ण होण्यासाठी गुरुदेव साधकांच्या माध्यमातून साहाय्य करतात’, असे वाटणे : पू. मावशींच्या सेवेत असतांना मी अनावश्यक विचारांत असेन, तर साधकांच्या माध्यमातून गुरुदेव मला लगेच त्याची जाणीव करून देतात. ‘तुला लहान वयात गुरुदेवांनी समष्टी संतांची सेवा दिली आहे. ती भावपूर्ण करण्याचा प्रयत्न कर’, असे सांगून साधक मला सेवा भावपूर्ण होण्यासाठी साहाय्य करतात.

२ ई. पू. मावशींच्या सहवासात राहिल्यावर ‘गुरूंचा खरा शिष्य कसा असायला हवा ?’, याची माझ्या मनाला जाणीव होते.

‘हे गुरुमाऊली, मी अज्ञानी आहे. ‘तुम्ही मला प्रसंगातून घडवता, मला तुमच्या सगुण रूपाच्या सेवेची संधी देता, साधनेत साहाय्य करता. कितीही चुका झाल्या, तरी तुम्ही मला पुनःपुन्हा सेवेची संधी देता’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. सानिका सोनीकर (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०२१)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक