स्वतःच्या आचरणातून ‘गुरुदेवांचे आज्ञापालन कसे करायचे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवणार्‍या पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७२ वर्षे) !

स्वतःच्या आचरणातून ‘गुरुदेवांचे आज्ञापालन कसे करायचे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवणार्‍या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७२ वर्षे) !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

आज आपण कपिलेश्वरी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे येथे पाहूया.

पू. (श्रीमती) सुमन नाईक

जन्मदिनांक : १.१.१९४९

जन्मतिथी : पौष शुक्ल पक्ष द्वितीया

संतपदी विराजमान : १९ जुलै २०१६

सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक म्हणजे प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता यांचा अनोखा संगम आहे. त्यांच्यातील सहजता या गुणामुळे त्या सर्वांना सहजतेने आपलेसे करून घेतात. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, याची त्यांना पुष्कळ तळमळ आहे. त्या साधकांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात आणि वेळोवेळी तत्त्वनिष्ठतेने त्यांच्या चुकाही लक्षात आणून देतात. सध्या त्या साधकांसाठी नामजपादी उपाय करतात.

साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् ते कृतीत आणून त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती, त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण, त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. सुगुणा गुज्जेटी

‘मला पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्या सत्संगात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे आणि त्या करत असलेल्या भावपूर्ण प्रार्थना पुढे दिल्या आहेत.

१. पू. सुमनमावशींनी शरणागतभावाने आणि आर्ततेने प्रार्थना करणे अन् त्यांनी केलेली प्रार्थना ऐकल्यावर ‘भगवंत समोर प्रगट झाला आहे’, असे वाटणे

एकदा पू. सुमनमावशींनी मला ‘शरणागतभाव वाढवण्यासाठी प्रार्थना म्हणून दाखव’, असे सांगितले. त्या वेळी मी त्यांना प्रार्थना म्हणून दाखवली. तेव्हा ‘प्रार्थना करतांना शरणागती आणि बोलण्यात आर्तता येण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे मला समजावे’, यासाठी त्यांनी मला प्रार्थना म्हणून दाखवली. त्या प्रार्थना करतांना त्यांच्यात इतका शरणागतभाव आणि आर्तता होती की, ‘भगवंत समोर प्रगट झाला आहे’, असे मला वाटत होते.

२. पू. मावशींनी ‘भावपूर्ण प्रार्थना कशी करायची ?’, हे शिकवणे आणि तेव्हापासून व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावाच्या स्तरावर होऊ लागणे

पू. मावशी देवाला आळवून प्रार्थना करत असतांना त्यांचा कंठ दाटून येतो. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात. ते भावाश्रू आवरण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. पू. मावशींनी आम्हाला ‘प्रार्थना करतांना देवाला कसे आळवायचे ? शरणागतीने आणि आर्ततेने प्रार्थना कशी करायची ?’, हे प्रत्यक्ष करून दाखवले अन् शिकवले. तेव्हापासून माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावाच्या स्तरावर होऊ लागले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर उत्तरदायी साधकाचे आज्ञापालन करणार्‍या पू. सुमनमावशी !

३ अ. पू. सुमनमावशींना नागीण झालेली असतांना उत्तरदायी साधकाने त्यांना चांगली साडी नेसून आश्रमात येण्यास सांगणे, पू. मावशींनी देवाला आळवणे आणि चांगली साडी नेसून आश्रमात जाणे अन् प.पू. गुरुदेवांनी त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करणे : एकदा पू. सुमनमावशींना नागीण झाली होती. तेव्हा त्या प.पू. गुरुदेवांना पुष्कळ आळवायच्या, तसेच त्यांना शरणागतीने प्रार्थना करायच्या. एकदा आश्रमातील उत्तरदायी साधकाने त्यांना निरोप पाठवला, ‘‘पू. सुमनमावशींना चांगली साडी नेसून आश्रमात यायला सांगा.’’ पू. सुमनमावशींना या निरोपाविषयी समजल्यावर त्यांनी देवाला पुष्कळ आळवले आणि सांगितले, ‘हे नारायणा, हे जगदीशा, माझी स्थिती तुला चांगली ठाऊक आहे, तरी आश्रमात मला चांगली साडी नेसून यायला सांगतोस. देवा, तुझे आज्ञापालन म्हणून मला तुझ्याकडे यायचे आहे. देवा, तूच सर्व बघून घे.’ त्यांनी साडी नेसल्यावर त्यांना काहीच त्रास झाला नाही. त्या आश्रमात गेल्यावर त्यांचा सत्कार प.पू. गुरुदेवांनी केला. ते  म्हणाले, ‘‘तुमचे आळवणे आणि विनवणी करणे’, देवाच्या चरणी पोचले. तुम्ही देवाला छान आळवता. यासाठी तुमचा सत्कार करत आहोत.’’

३ आ. प.पू. गुरुदेवांनी पू. मावशींना कोकणीऐवजी मराठीतून सत्संग घ्यायला सांगणे, मराठी भाषेत आणि ध्वनीवर्धक हातात धरून बोलण्याचा सराव नसतांनाही त्यांनी प्रार्थना करून सत्संग घेणे अन् सत्संग चांगला झाल्याचे साधकांनी नंतर सांगणे : एकदा प.पू. गुरुदेवांनी पू. सुमनमावशींना कोकणीऐवजी मराठीतून सत्संग घ्यायला सांगितला. तेव्हा त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, ‘मला ध्वनीवर्धक (माईक) कसा धरायचा ?’, हे ठाऊक नाही आणि मी मराठीत कधी बोलले नाही. हे भगवंता, तूच माझ्या मुखातून बोल. मला काहीच येत नाही. मी अज्ञानी आहे.’ नंतर त्यांनी सत्संगात मराठीतून बोलण्यास आरंभ केला. सत्संग संपल्यावर साधकांनी त्यांना विचारले, ‘‘पू. मावशी, तुमच्या हातातील ध्वनीवर्धकावर लोहचुंबक लावला होता का ? तुमच्या हातातील ध्वनीवर्धक जराही इकडे-तिकडे झाला नाही आणि सत्संग फारच छान झाला.’’ त्या वेळी पू. मावशींच्या मनात केवळ ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, हाच ध्यास होता. तेव्हा पू. मावशींना ‘त्यांनी ध्वनीवर्धक हातात धरला होता’, हे लक्षातच नव्हते. साधकांनी त्यांना याविषयी सांगितल्यावर त्यांना ध्वनीवर्धक हातात घेऊन बोलल्याची जाणीव झाली.

४. अहंशून्यता

प्रसारातील साधक पू. मावशींना व्यष्टी साधनेचा आढावा देतात. तेव्हा साधक सांगत असलेल्या काही शब्दांचे अर्थ पू. मावशींच्या लक्षात येत नाहीत. तेव्हा पू. मावशी संबंधित साधकांना त्या शब्दाचा अर्थ विचारून घेऊन ‘प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी त्यांना सांगतात.

५. पू. सुमनमावशींनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे

५ अ. आपण आपल्या मनावर योग्य कृती करण्याचा संस्कार केला, तर आपल्याकडून योग्य कृती होईल ! : केवळ स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीची सारणी लिहून आपल्यात पालट होत नाही, तर आपल्याकडून झालेल्या चुकीविषयी चिंतन करून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. स्वतःत पालट घडवायचा असेल, तर आपल्यात शिस्त असायला पाहिजे. प्रत्येक कृती योग्यरित्याच केली पाहिजे. आपण आपल्या मनावर योग्य कृती करण्याचा संस्कार केला, तर आपल्याकडून योग्य कृती होईल.

५ आ. आपली तळमळ असेल, तर आपण कुठेही बसून नामजप आणि साधना करू शकतो; कारण देव सगळीकडे आहे.

५ इ. आपण आपला अहं बाजूला ठेवून आणि निःशब्द राहून इतरांकडून शिकायला हवे ! : एकदा आश्रमात होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता आले होते. त्या वेळी मला त्यांच्या समवेत राहून शिकायला सांगितले होते. मी पू. मावशींना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला ‘इतरांकडून कसे शिकायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,  ‘‘एकदा दोन साधिका खीर बनवत होत्या. एका साधिकेकडे खिरीत घालण्यासाठी काजू आणि बदाम होते. त्यामुळे तिने बनवलेली खीर चांगली झाली होती. दुसर्‍या साधिकेकडे काजू आणि बदाम नसतांनाही तिने बनवलेली खीर चांगली झाली होती. आपण दुसर्‍या साधिकेकडून खीर बनवण्याची पद्धत शिकून घेतली पाहिजे. आपल्याला एखादा पदार्थ चांगल्या प्रकारे बनवता येत असला, तरी आपण न्यूनता घेऊन अन्य साधिकांकडून पदार्थ बनवण्याची पद्धत शिकून घेतली पाहिजे. ‘मला पदार्थ चांगल्या प्रकारे बनवता येतो’, हा अहं नको.’’ नंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही परिचारिका (नर्स) आहात’, हे सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही ‘मी सर्व करू शकते’, असा अहंयुक्त विचार न करता ‘अन्य साधक उपचार कसे करतात ?’, हे शिकून घेणे महत्त्वाचे आहे. आपण आपला अहं बाजूला ठेवून आणि निःशब्द राहून इतरांकडून शिकायला हवे.’’ – कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)

संतपद घोषित झाल्यानंतर गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी साधकांना मार्गदर्शन करता येणे

वर्ष २०१६ मध्ये मी संत झाल्यानंतर मला साधकांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. तेव्हा ‘आपण आनंदी राहिलो, तर देवाच्या कृपेने सर्वच आनंदमय होते’, हे मला जाणवले. मला ‘आढावा कसा घ्यायचा ? काय बोलायचे ?’, हे कळत नव्हते. अशा वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे. गुरुदेवांना सांगितल्यावर मला सर्व जमू लागले. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी प्रयत्न कसे करायचे ?’, हे मला साधकांना सांगता येऊ लागले. परात्पर गुरुदेवांनी मला इतक्या अनुभूती दिल्या आहेत की, मी त्या सर्व शब्दांत सांगू शकत नाही. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! – पू. (श्रीमती) सुमन (मावशी) नाईक (१७.७.२०१८)


पू. सुमनमावशी करत असलेल्या भावपूर्ण प्रार्थना !

अ. प.पू. गुरुदेवा, हे नारायणा, मी काय करू रे देवा ? माझ्यात भाव नाही. मी भाव वाढवण्यासाठी काय करू ? हे जगदीशा, इतक्या वर्षांत माझे आई-वडील आणि भाऊ-बहीण यांनी मला जे शिकवले नाही, ते सर्व तुम्ही शिकवले आहे, तरी मी जिथे आहे, तिथेच आहे रे भगवंता ! देवा, दगडासारखी मी एकाच ठिकाणी आहे रे ! भगवंता, मी कसे प्रयत्न करू ? तूच माझ्याकडून प्रयत्न करवून घे.

आ. हे गुरुदेवा, हे जगदीशा, तू माझ्या समवेत सतत असतोस, तरी तू मला या डोळ्यांनी दिसत नाहीस. मी डोळे असून आंधळी आहे. हे नारायणा, मला काही कळत नाही. मला काही येत नाही. मी अज्ञानी आहे.’

– कु. सुगुणा गुज्जेटी, (७.१.२०२१)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतीच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक