शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना धमक्या मिळत असल्याने त्यांना सुरक्षा पुरवली जाणार ! – गृहमंत्री

भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याचे प्रकरण

दिलीप वळसे पाटील

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – ‘इतर मागासवर्गीय (‘ओबीसी’) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे’, या सूत्रावर अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभेत ५ जुलै या दिवशी गदारोळ झाला. या गदारोळात भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. यानंतर ‘शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना सामाजिक माध्यमांतून धमकी दिली जात आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी’, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ६ जुलै या दिवशी विधानसभेत केली. या मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भास्कर जाधव यांना सुरक्षा दिली जाईल, असे सांगितले.

मला सुरक्षेची आवश्यकता नाही ! – भास्कर जाधव

भास्कर जाधव

आमदार म्हणून सामाजिक जीवनात काम करत असतांना अनेक चढउतार राजकीय जीवनात पाहिलेले आहेत. हे होत असतांना राज्य सरकारने नेहमीच मला सुरक्षा पुरवली आहे; मात्र राज्य सरकारने सांगूनही मी कधीही सुरक्षा घेतलेली नाही.  आताही मला सुरक्षा नको; मात्र सध्याची परिस्थिती पहाता राज्य सरकारला जर वाटत असेल, तर मला सुरक्षा दिली गेली पाहिजे, तर ती सुरक्षा मी घेईन, असे भास्कर जाधव यांनी विधानसभेत तालिका अध्यक्ष असतांना सांगितले.