‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे डॉ. महेश जाधव यांच्या गैरकारभारास उत्तरदायी असणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद व्हावा ! – दीपक माने

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (डावीकडे) यांना निवेदन देतांना भाजप आमदार सुधीर गाडगीळ आणि दीपक माने

सांगली, ७ जुलै (वार्ता.) – सांगली येथील ‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे डॉ. महेश जाधव  यांच्या आणि त्यांच्या रुग्णालयातील गैरकारभारास उत्तरदायी असणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा, अशा मागणीचे निवेदन भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे दिले आहे. या वेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महेश जाधव आणि त्यांचे सहकारी यांच्यावर मिरज येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ‘ॲपेक्स’ रुग्णालयात चुकीचे उपचार केल्याने ८७ रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले. मृत्यू झालेल्या ८७ रुग्णांच्या माहितीपैकी केवळ २२ रुग्णांची माहितीच प्रशासनाला देण्यात आली. ही अत्यंत गंभीर गोष्ट असून या सर्व प्रकरणांची विशेष पथकाद्वारे चौकशी व्हावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा.