कोरोनाच्या काळातही समाजातून पुस्तक खरेदीचे प्रमाण समाधानकारक आहे. पुस्तक विक्रेत्यांचे हे मत समाजात आजही वाचन संस्कृती जपली जात असल्याचे दर्शवते. किंबहुना दळणवळण बंदीमुळे लोकांना आता पूर्वीच्या तुलनेत अधिक वेळ उपलब्ध होत असून वाचन करणार्यांची संख्या वाढली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ‘कोरोना रुग्णांना वाचनासाठी चांगली पुस्तके उपलब्ध करून द्या’, अशी मागणीही समाजातून होत आहे. वाचनामुळे विचार आणि चिंतन प्रक्रियेला चालना मिळते. विचारांनुसारच माणूस घडतो. साहित्याचा मानवी जीवनावर म्हणूनच विशेष प्रभाव पडतो. यादृष्टीने साहित्य अर्थात्च ते राष्ट्र-धर्माभिमुख असायला हवे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही म्हटले होते.
स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने साहित्यात विद्रोही वृत्तीचा शिरकाव झाला. तथाकथित मानवतावाद, विज्ञानवाद, पुरोगामीपणा आणि निधर्मीपणा यांची विषवल्ली रुजवणार्या पुस्तकांची निर्मिती वाढली. तथाकथित विवेकवादाच्या नावाखाली लोकांच्या धर्मश्रद्धा आणि प्रामुख्याने किंबहुना केवळ हिंदूंच्याच धर्मश्रद्धांचे भंजन करण्याचे काम पुस्तकांसह विविध मार्गातून चालू आहे. शालेय पाठ्यपुस्तकांतही साहित्यातील या विषवल्लीचा प्रभाव पडला आहे. साहित्याच्या माध्यमातून विद्रोही आणि राष्ट्र-धर्मविरोधी विचार रुजवणे, हे ‘स्लो पॉयझन’प्रमाणे आहे. यामुळे नव्या पिढीची दिशाभूल होते.
तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विद्रोही यांच्यामुळे साहित्यक्षेत्र डागाळले असले, तरी साहित्यक्षेत्रात राष्ट्र-धर्म यांना अनुसरून योग्य लिखाण करणारे साहित्यिकही आहेत. या साहित्यिकांनी विपुल लिखाण करून समाजासाठी चिंतनाच्या वाटा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे वाचकांनी योग्य निवड करण्याची आवश्यकता आहे. आजच्या नवोदित साहित्यिकांनीही राष्ट्र आणि धर्म यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांप्रती अभिमान असणारा वाचकवर्ग निर्माण होईल, असे लिखाण करण्यासाठी पुढे यायला हवे. समाजानेही तथाकथित विवेकवादाच्या आडून चालणारी विषवल्ली उखडून टाकायला हवी. असे झाल्यास साहित्यक्षेत्राची, राष्ट्र-धर्माची आणि पर्यायाने समाजाची भरभराट होईल, हे नक्की !
– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल