गावागावांत केली जात आहे फवारणी
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचे थैमान चालू असतांनाच आता डेंग्यू आणि मलेरिया या साथींचे रुग्ण सापडत आहेत. मलेरियाचे एकूण ७ रुग्ण, तर डेंग्यूचे ३३ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात या साथींचे प्रमाण घटावे, यासाठी गावागावांत आरोग्य विभागाच्या वतीने फवारणी केली जात आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचे ५ रुग्ण मे मासाच्या अखेर, तर २८ रुग्ण जून मासात सापडले. यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये १९, दोडामार्ग ११, कणकवली २ आणि कुडाळ तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.
पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला पाणी साचल्याने या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. या डासांची अळी नियंत्रित करण्यासाठी साचलेल्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येतात, तसेच गटारे वहाती नसल्यास त्या पाण्यातही अशा प्रकारचे डास निर्माण होतात. त्यामुळे अशी गटारे वहाती करावीत. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी कुंडीमध्ये पाणी साचू देऊ नये. कुंडीखाली ‘प्लेट’ ठेवली असल्यास त्यातील पाणी प्रतिदिन पालटावे. ‘फ्रिज’, ‘वातानुकूलित यंत्र (ए.सी.)’ यांमधून बाहेर पडणारे पाणी साठण्यासाठी ठेवलेल्या ‘ट्रे’ मधील पाणी काढून प्रत्येक आठवड्याला ‘ट्रे’ साफ करावेत. घराच्या आजूबाजूला पाणी साठेल असे साहित्य असेल, तर ते काढावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.