‘सर्व काही देवच करवून घेतो’, या भावात असणारे आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणारे सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा (वय ८६ वर्षे) !
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणाच्या या दिवशी गुरुतत्त्व एक सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
आज आपण सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.
जन्मदिनांक : १४.२.१९३५ वाढदिवस : माघ शुक्ल पक्ष एकादशी (२३ फेब्रुवारी २०२१) या दिवशी झाला संतपदी विराजमान : ५.११.२०१८ |
१. मुलगा पूर्णवेळ सेवा करू लागल्यावर घरी पैशांची अडचण असतांना परिस्थिती सहजतेने स्वीकारणारे पू. आबा !
‘श्री. कौस्तुभ (पती) पूर्णवेळ साधना करू लागल्यावर कधी कधी घरी खर्चाला पैसे न्यून पडायचे. घरात पैशांची अडचण होती, तरी पू. आबांनी मला ती कधी जाणवू दिली नाही. तेव्हा कधी कधी पू. आबांनी नुसत्या वरणासमवेत भाकरी खाल्ली; पण कधीही चिडचिड किंवा तक्रार केली नाही. आमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात त्यांनी आम्हाला साथ दिली आहे आणि अजूनही तेच आमचे आधार आहेत.
२. पू. आबांची अनुभवलेली प्रीती !
२ अ. नातीचे अंथरूण घालून देणे : माझी मोठी मुलगी ऋतुजा (आताची सौ. स्वराली पाध्ये) लहानपणी माझ्या मांडीवर झोपायची. ‘ती झोपली आहे’, हे लक्षात आले की, पू. आबा लगेच तिच्यासाठी अंथरूण घालून द्यायचे.
२ आ. ‘मुलगा आणि सून यांना कामावर वेळेत जाता यावे’, यासाठी स्वयंपाकात साहाय्य करून त्यांना जेवू घालणारे पू. आबा ! : सौ. स्वराली ३ मासांची असतांना सकाळी ८ ते १० या वेळेत माझा बालवाडीचा वर्ग आणि शिकवणी वर्गही असायचा. त्या वेळी पू. आबा आणि सासूबाई मला अन् श्री. कौस्तुभ यांना गरम गरम भाजी-भाकरी करून जेवायला द्यायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे, ‘‘तुम्ही करू नका. मी करते.’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘आता तुला आमच्या साहाय्याची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे ‘मीच सर्व केले पाहिजे’, असा विचार तू करू नकोस.’’ सासूबाई कर्करोगाने आजारी होत्या, तरी त्या भाकरी करायच्या आणि पू. आबा भाकरी भाजायचे. हे सर्व आठवल्यावर आजही माझी भावजागृती होते.
३. नातींवर चांगले संस्कार करणे
पू. आबा कर्मकांडही पुष्कळ भावपूर्ण आणि मनापासून करायचे. त्यामुळे माझ्या मुलींवर कर्मकांड मनापासून करण्याचे आणि इतरही अनेक चांगले संस्कार झाले आहेत.’
– सौ. केतकी कौस्तुभ येळेगावकर (पू. आबांची थोरली सून), देहली सेवाकेंद्र (१४.१२.२०१८)
अपूर्व योग भेटीचा जुळूनी आला ।
पू. बलभीम येळेगावकरआजोबा जयसिंगपूर येथे त्यांचे चिरंजीव श्री. अनंत येळेगावकर यांच्याकडे २ दिवस आले होते. श्री. अनंत येळेगावकर यांच्याकडे मी त्यांना भेटायला गेल्यावर मला कळले की, आज (२३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी) पू. ‘आजोबांचा वाढदिवस आहे.’ मी लगेच त्यांच्या चरणी दंडवत घातले. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि माझी भावजागृती झाली. त्यांच्याकडून मिळालेला उपदेश समष्टीला लाभावा; म्हणून गुरुदेवांनी ही कविता माझ्याकडून लिहून घेतली.
अपूर्व योग भेटीचा जुळूनी आला ।
संतचरणी नमस्कार घडला ।। धृ. ।।
सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु
डॉ. जयंत बाळाजी आठवले ।
ऐसे मुखी जयाचे अखंड नाम ।
तयाचे अंतरी विलसे
विलक्षण समाधान ।। १ ।।
त्याचे बिंब मुखावरी दिसे ।
सदैव हास्य मुखावरी उमले ।
पहाता त्या सगुण मूर्तीला ।
विलक्षण प्रसन्नता भासे जिवाला ।। २ ।।
वाढदिवसादिनी दर्शन घडले ।
जणू पूर्वसुकृत फळा आले ।
चरणी माथा टेकता ।
भावाश्रू नयनी आले ।। ३ ।।
देवा, प्रमाद अजाणतेपणी घडला ।
क्षमा करावी या अपराधी जिवाला ।
‘आज वाढदिवस होता’,
हे नव्हते ध्यानी मनी ।
तेथे गेल्यानंतर आले, हे ध्यानी ।। ४ ।।
उपदेश बहोत केला ।
मुखी स्मरावे अखंड ।
सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे नाम ।
तेची वहातात आपला योगक्षेम ।
याची बाळगावी मनी निश्चिती ।। ५ ।।
बुद्धीने नका करू विचार ।
गुरु आज्ञापालन करावे ।
तेची वहातात आपले खांद्यावरी ।
अखंड विश्वाचा भार ।। ६ ।।
उपदेश जो या अल्पमतीला कळला ।
तो देवा आपणच लिहूनी घेतला ।
तो वहातो आपले चरणी ।
द्यावी मज कर्तेपणातून मुक्ती ।। ७ ।।
– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर (२३.२.२०२१)
सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संतांच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !
‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे. लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected] पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१ |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |