सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ४८२ शाळा अल्प पटसंख्येमुळे बंद होणार

  • अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत होणार विद्यार्थ्यांचे समायोजन

  • जिल्ह्यात केवळ १ विद्यार्थी असलेल्या २१ शाळा

 

सिंधुदुर्ग – प्राथमिक शाळांमधील रोडावत चाललेली विद्यार्थी पटसंख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. १० हून अल्प पटसंख्येच्या एकूण ४८२ शाळा आहेत. अल्प पटसंख्या असलेल्या या शाळांचे अधिक पटसंख्या असलेल्या शाळांत समायोजन करण्यात येणार आहे. समायोजन करतांना जिल्ह्यातील दुर्गम आणि अतीदुर्गम भागांतील शाळा प्रथम निश्‍चित कराव्यात, असा आदेश शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी २९ जूनला झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत दिले. समायोजित होणार्‍या त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांना ३ सहस्रांऐवजी १५ सहस्र रुपये प्रवास भत्ता शासनाकडून मिळावा, असा ठरावही या सभेत संमत करण्यात आला.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा २९ जूनला सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. या वेळी दादा कुबल, सरोज परब, संपदा देसाई, सुधीर नकाशे, उन्नती धुरी आदी सदस्य, तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात एकच विद्यार्थी असलेल्या २१ शाळा, २ विद्यार्थी – ३२ शाळा, ३ विद्यार्थी – ४७ शाळा, ४ विद्यार्थी – ५४ शाळा, ५ विद्यार्थी – ४६ शाळा, ६ विद्यार्थी – ५९ शाळा, ७ विद्यार्थी – ५७ शाळा, ८ विद्यार्थी – ४९ शाळा, ९ विद्यार्थी – ६२ शाळा आणि १० विद्यार्थी असलेल्या ५५ शाळा, अशा १० पटसंख्येच्या आतील ४८२ शाळा आहेत.

अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना अधिक पटसंख्येच्या शाळांमध्ये समायोजित केले, तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासमवेतच त्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवता येतील, असे शासनाचे धोरण आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ राबवणार

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी कोरोनाच्या साथीमुळे शैक्षणिक प्रगतीत मागे राहिल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ जुलै ते २४ ऑगस्ट या ४५  दिवसांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही जिल्ह्यात चालू होणार आहे. शासनाकडून प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विषयाच्या ‘पी.डी.एफ्.’ धारिका पाठवण्यात आल्या असून केंद्रप्रमुखांद्वारे त्या शालेय शिक्षकांकडे आणि शिक्षकांकडून शेवटी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ विद्यार्थ्यांना ‘पी.डी.एफ्.’च्या आधारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. ५० टक्के शिक्षक कोरोना महामारीच्या अनुषंगाने सेवेत असून उर्वरित ५० टक्के शिक्षक ‘सेतू अभ्यासक्रम’ उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.