आवाडे येथील हानीग्रस्त शेतकर्‍याला पालकमंत्र्यांकडून ५० सहस्र रुपयांचे साहाय्य

रेडा तिलारी नदीच्या प्रवाहात वाहून गेला

दोडामार्ग – तालुक्यातील आवाडे येथील शेतकरी रमेश नाईक यांचा एक रेडा तिलारी नदीच्या प्रवाहात वाहून गेला, तर एक रेडा घायाळ झाला होता. नाईक यांना तातडीने साहाय्य मिळावे, यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी आणि शिवसेना उपजिल्हासंघटक गोपाळ गवस यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने पालकमंत्री सामंत यांनी नाईक यांना तात्काळ ५० सहस्र रुपयांचे साहाय्य केले.

८ दिवसांपूर्वी तालुक्यातील आवाडे येथील शेतकरी रमेश नाईक यांचा एक रेडा तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, तर एक रेडा घायाळ झाला होता. या प्रकरणी प्रशासनाकडून हानीभरपाई न मिळाल्याने येथील शेतकर्‍यांनी तिलारी जलसंपदा उपविभागाचे कार्यकारी अभियंता विनय कोरे यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घायाळ रेड्यासह आंदोलन केले; मात्र या आंदोलनाकडे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी हानीभरपाई मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला होता. (शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासकीय अधिकारी जनतेचे अन्य प्रश्‍न कसे सोडवत असतील ? अशांवर सरकारने कठोर कारवाई केल्यासच प्रशासकीय कारभारात सुधारणा होईल ! – संपादक)

तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनय कोरे यांनी याविषयी ‘तात्काळ विशेष गोष्ट म्हणून प्रस्ताव सादर करण्यात येईल, तसेच तिलारी धरणाशी संबंधित विविध समस्यांविषयी पालकमंत्री सामंत यांची तिलारी येथे बैठक लावण्यात येईल’, असे सांगितले होते.