व्यक्तीचे कपडे तिच्या मापानुसार योग्य पद्धतीने शिवल्याने कपड्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता येते, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे !

शिवणकलेविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘प्रत्येक वस्तूला गुणभूत स्पंदने असतात. कपड्याचा प्रकार, आकार, रंग, वेलवीण (नक्षी), कपड्याची शिलाई इत्यादी घटकांवर कपड्यातील स्पंदने अवलंबून असतात. तसेच कपडे शिवणार्‍या व्यक्तीच्या मन:स्थितीचा तिने शिवलेल्या कपड्यांवर सूक्ष्म परिणाम होत असतो. हे घटक जितके सात्त्विक असतील, तितके कपडे सात्त्विक बनतात. सात्त्विक कपडे परिधान केल्याने व्यक्तीला सात्त्विकता आणि ईश्वरी चैतन्य यांचा लाभ होतो.

सध्या बहुतेकांचा कल ‘रेडिमेड’ कपडे (शिवलेले कपडे) वापरण्याकडे असतो. दुकानांमध्ये जे ‘रेडिमेड’ कपडे मिळतात, त्यांचे ‘कटिंग’ आणि शिलाई योग्य प्रकारे केलेली नसते. त्यामुळे अशा कपड्यांचे खांदे उतरतात, कपडे घट्ट किंवा सैल होतात, कपड्यांची उंची किंवा छातीची मापे कमी-अधिक असतात, कपड्यांचे खिसे योग्य प्रकारे शिवलेले नसतात, कपड्यांची शिवण चांगली नसल्याने ती उसवते इत्यादी. यामुळे दुकानातून ‘रेडिमेड’ कपडे घेतले, तरी बहुतेक वेळा ते शिंप्याकडून ‘आल्टर’ (त्यामध्ये आवश्यक ते पालट करणे) करून घेऊन मगच वापरता येतात, असा अनुभव अनेकांना येतो.

‘कपडे शिवतांना व्यक्तीच्या मापानुसार योग्य पद्धतीने शिवणे का आवश्यक आहे ?’, हे स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे. हे अभिनव संशोधन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

सौ. पार्वती जनार्दन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या नवीन सुती बंड्यांमध्ये पालट करण्यासाठी त्या शिवणकामाची सेवा करणार्‍या साधिका सौ. पार्वती यांना देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी दुकानातून पांढर्‍या रंगाच्या दोन सुती बंड्या आणल्या होत्या. त्यांनी बंड्या घालून पाहिल्या, तेव्हा त्यांना त्या नीट बसत नव्हत्या. त्यामुळे बंड्यांमध्ये आवश्यक ते पालट करण्यासाठी त्या सनातनच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. पार्वती जनार्दन यांच्याकडे दिल्या.सौ. पार्वती जनार्दन सनातनच्या रामनाथी आश्रमात कपडे शिलाई करण्याची सेवा करतात. सौ. पार्वती यांनी बंड्यांमध्ये काही पालट केले, उदा. छातीचे आणि खांद्याचे माप यांमध्ये पालट करणे, काखेचे माप आणि आकार यांमध्ये पालट करणे, बंडीचा खिसा योग्य ठिकाणी बसवणे, बटणपट्टीत थोडा पालट करणे, बंडीची पुढची अन् मागची खालील बाजू जुळवून घेणे इत्यादी. दोन्ही बंड्यांमध्ये प्रत्येक वेळी पालट करून झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्या घालून पहात आणि पुढील पालट करण्यासाठी सौ. पार्वती यांना देत. पहिल्या बंडीत एकूण १३ वेळा आणि दुसर्‍या बंडीत एकूण ८ वेळा पालट करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बंड्या परात्पर गुरु डॉक्टरांना व्यवस्थित बसल्या, तेव्हा त्या बंड्यांच्या आतील शिवणींना ‘ओव्हरलॉक’ शिवण घालून त्या अंतिम करण्यात आल्या.

‘सौ. पार्वती यांनी दोन्ही बंड्यांमध्ये पालट केल्यावर त्या बंड्यांवर (कपड्यांवर), तसेच त्यांच्या स्वतःवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

सौ. पार्वती जनार्दन यांनी प्रत्येक वेळी बंड्यांमध्ये पालट करण्यापूर्वी आणि पालट केल्यानंतर त्यांची, तसेच दोन्ही बंड्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण

१ अ १. बंड्यांमध्ये पालट केल्यावर त्यांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : दोन्ही बंड्यांमध्ये प्रत्येक टप्प्यावर पालट केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढत गेली. जागेअभावी बंड्यांतील सर्व पालटांची निरीक्षणे न देता, काही निवडक पालटांची निरीक्षणे पुढील सारणीत दिली आहेत. (काही ठिकाणी बंड्यांमध्ये पालट केल्यानंतर त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याचे कारण सूत्र ‘२ इ’ मध्ये दिले आहे.)

१ अ २. बंड्यांमध्ये पालट केल्यानंतर सौ. पार्वती यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : दोन्ही बंड्यांमध्ये प्रत्येक वेळी पालट केल्यानंतर सौ. पार्वती यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. जागेअभावी सौ. पार्वती यांची सर्व निरीक्षणे न देता, काही निवडक निरीक्षणे पुढील सारणीत दिली आहेत.

२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. सौ. पार्वती यांनी बंड्यांमध्ये पालट केल्यानंतर बंड्यांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ होण्याचे कारण

२ अ १. सौ. पार्वती यांनी बंड्यांमध्ये केलेल्या योग्य पालटांमुळे बंड्या अधिकाधिक सात्त्विक बनणे : सौ. पार्वती यांना दोन्ही बंड्यांमध्ये अनेक वेळा विविध पालट करावे लागले, सौ. पार्वती यांनी बंडीत पालट केल्यानंतर प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टर बंडी घालून पहात होते. बंडी घातल्यावर काही ठिकाणी बंडीला चुण्या पडत होत्या. कपड्याला चुण्या पडल्याने त्यामधून चांगली स्पंदने येत नाहीत. यामुळे त्यांनी सौ. पार्वती यांना चुण्या काढण्यास सांगितले. सौ. पार्वती यांनी चुण्या काढण्यासाठी पुष्कळ श्रम घेतले. सर्वसाधारणपणे तयार शिवलेल्या कपड्यांमध्ये पालट करण्यास पुष्कळ मर्यादा येतात. त्यामुळे पालट करतांना ते अतिशय कौशल्याने आणि चिकाटीने करावे लागतात. पहिल्या बंडीत एकूण १३ वेळा आणि दुसर्‍या बंडीत एकूण ८ वेळा पालट केल्यानंतर त्या बंड्या परात्पर गुरु डॉक्टरांना नीट बसल्या.

२ अ २. सौ. पार्वती यांच्यातील शिकण्याच्या वृत्तीमुळे पहिल्या बंडीच्या तुलनेत दुसरी बंडी कमी पालटांमध्ये अंतिम होणे : पहिल्या बंडीच्या अनुभवातून शिकून दुसर्‍या बंडीत पालट करतांना सौ. पार्वती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दुसरी बंडी पूर्ण उसवल्यावर तिच्या कापण्यातील (कटींगमधील) त्रुटी नीट करून मग ती बंडी पुन्हा शिवली. सर्वसाधारणपणे ‘ रेडीमेड’ बंड्यांचे प्राथमिक कापणे व्यवस्थित केलेले नसल्याने त्यात दुरुस्त्या करणे पुष्कळ कठीण जाते. तसेच पहिल्यांदाच कापड मापानुसार कापतांना वेडेवाकडे कापलेले असल्यास पालट करण्यास पुष्कळ मर्यादा येतात. हाच अनुभव सौ. पार्वती यांना पहिली बंडी उसवून करतांना आला. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या बंडीत अन्य पालट करण्यापूर्वी बंडी उसवल्यावर प्रथम तिच्या अयोग्य कापण्यामुळे झालेल्या त्रुटी दूर केल्या आणि मग अन्य पालट केले. यामुळे पहिल्या बंडीच्या तुलनेत दुसरी बंडी कमी पालटांमध्ये अंतिम झाली. यातून ‘कपडे शिवतांना कापड मापानुसार व्यवस्थितरित्या कापणे किती आवश्यक आहे’, हे लक्षात येते.

सौ. पार्वती यांनी बंड्यांमध्ये केलेल्या योग्य पालटांमुळे बंड्यामध्ये ईश्वरी चैतन्य आकृष्ट करण्याची क्षमता वाढत गेली. याचा परिणाम म्हणून बंड्यांमध्ये पालट केल्यानंतर बंड्यांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर वाढत गेली.

२ आ. सौ. पार्वती यांनी संतांचे कपडे शिवण्याची सेवा भावपूर्ण केल्याने त्यांना सेवेतून चैतन्य मिळणे : बंड्यांमध्ये पालट करतांना सौ. पार्वती यांना लक्षात आले की, तयार बंडीत पालट करणे पुष्कळ किचकट आणि कठीण आहे. तसेच त्याला पुष्कळ मर्यादा येतात. त्यामुळे काही वेळा मनामध्ये नकारात्मक विचार येऊन त्यांना ताण येत असे. दोन्ही बंड्यांमध्ये पालट करण्याच्या कालावधीत काही वेळा त्यांच्याविषयी अनेक प्रसंग घडत होते; त्यामुळे त्यांचे मन अस्थिर होत होते. त्यांच्या मानसिक स्थितीचा परिणाम त्यांच्या शिवणकामावर होत होता. जेव्हा त्यांना याची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी प.पू. बाबांना (प.पू. भक्तराज महाराज यांना) अत्यंत शरणागतभावाने भावपूर्ण प्रार्थना केली. त्यानंतर त्यांचे मन शांत होऊन त्या सकारात्मक झाल्या. त्यांचे मन स्थिर झाल्यावर त्यांनी पुन्हा शिवणकामाला प्रारंभ केला. सौ. पार्वती यांनी अशा प्रकारे परिस्थिती स्वीकारून आणि सकारात्मक राहून बंड्यांतील सर्व पालट न कंटाळता अतिशय चिकाटीने केले. संतांचे कपडे (परात्पर गुरु डॉक्टरांच्या बंड्या) शिवण्याची सेवा भावपूर्ण केल्याने त्यांना सेवेतून चैतन्य मिळाले. प्रत्येक वेळी शिवणकाम केल्यानंतर जेव्हा त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली, तेव्हा त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे दिसून आले.

२ इ. काही वेळा बंड्यांमध्ये पालट केल्यानंतर त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येण्यामागील कारण : वाईट शक्तींनी बंड्यांवर त्रासदायक आवरण आणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या अभिनव संशोधनात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. बंड्यांवर काही वेळा त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याने त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. बंड्यांमध्ये पालट करून झाल्यावर त्या बंड्या परात्पर गुरु डॉक्टर घालून पहात. त्या वेळी त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे बंड्यांवरील आवरण नाहीसे होऊन त्यांतील चैतन्यात वाढ होत होती. ईश्वरकृपेने संशोधनात येणारे सर्व अडथळे दूर होऊन संशोधन पूर्ण झाले.

थोडक्यात, या अभिनव संशोधनातून कपडे शिवतांना मापानुसार ते योग्य पद्धतीने शिवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. कपडे शिवणार्‍या व्यक्तीच्या मन:स्थितीचा तिने शिवलेल्या कपड्यांवर सूक्ष्म परिणाम होत असतो, हे लक्षात घेऊन कपडे शिवणार्‍यांनी सौ. पार्वती यांच्याप्रमाणे प्रयत्न केल्यास त्यांनाही चैतन्य मिळेल आणि कपडे सात्त्विक बनल्याने ते वापरणार्‍याला सात्त्विकतेचा लाभ होईल.कपड्यांच्या शिलाईसंदर्भातील या संशोधनातून योग्य मापानुसार शिलाई करण्याचे महत्त्व लक्षात येते. समाजातील सर्वांनी सात्त्विक कपडे शिवल्यास त्यातून त्यांना ईश्वरी चैतन्य मिळेल. यामुळे समाजाची सात्त्विकता वाढेल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.