ठाणे येथील शास्त्रीय गायक पंडित संजय मराठे यांचे निधन !

पंडित संजय मराठे

ठाणे – संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव गायक, संवादिनी आणि ऑर्गन वादक पंडित संजय मराठे (वय ६८ वर्षे) यांचे १५ डिसेंबरच्या रात्री ठाणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे रुग्णालयात निधन झाले. १६ डिसेंबर या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पंडित संजय मराठे यांचा मुख्य सहभाग होता. त्यांचे धाकटे बंधू गायक श्री. मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत ‘मंदारमाला’ हे संगीत नाटक पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगमंचावर आणले आणि त्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहेत. पंडित संजय मराठे यांनी संगीताविषयी मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थी घडवले आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला अमूल्य मार्गदर्शन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत संशोधन कार्यात पं. संजय मराठे यांचा सातत्याने सहभाग असायचा. त्यांचे संगीतविषयक अमूल्य मार्गदर्शन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना लाभले आहे. त्यांचा त्यांच्या वडिलांप्रती (पं. राम मराठे यांच्याप्रति) शिष्यभाव होता. त्यांच्या संगीत साधनेमुळे त्यांनी अध्यात्मात प्रगती करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने एप्रिल २०२२ मध्ये घोषित केले होते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पंडित संजय मराठे यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली !