अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष
लॅन्सिंग (अमेरिका) – अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाने एका नवीन अभ्यासात असा निष्कर्ष काढला आहे की, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ सेवन केल्याने आयुष्य अल्प होऊ शकते. या नव्या अभ्यासाने प्रक्रिया केलेल्या अन्नाचे धोके पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत. पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग (गोमांस, डुक्कराचे मांस आदींपासून बनवलेला पदार्थ), सँडविच, कोक यांसारखे अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आपले आयुष्य अल्प करतात.
१. आपण जर एक हॉट डॉग खाल्ले, तर ते आपल्या आयुष्यातील ३६ मिनिटे अल्प करू शकते. जर आपण या हॉट डॉगसोबत कोक प्यायलो, तर आपल्या आयुष्यातील आणखी १२ मिनिटे अल्प होऊ शकतात.
२. न्याहारी करतांना सँडविच आणि अंडी खाल्ल्याने आपल्या आयुष्यातील १३ मिनिटे अल्प होऊ शकतात.
३. या नवीन अभ्यासात कुठले पदार्थ खाल्ल्याने आपले आयुष्य वाढू शकते, यावरही संशोधन केले आहे.
४. या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, विशिष्ट मासे खाल्ल्याने आपले आयुष्य २८ मिनिटांनी वाढू शकते.
५. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे डॉ. ऑलिव्हियर जोली यांनी आपल्या खाण्याच्या सवयी पालटणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले.
६. या वर्षी ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ने एका अहवालात म्हटले होते की, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ले, तर हृदयविकार, मानसिक समस्या आणि मधुमेह यांचा धोका लक्षणीय वाढू शकतो. यामुळे निद्रानाश, नैराश्य, आदी समस्याही होऊ शकतात.
संपादकीय भूमिकाफास्ट फूडच्या आहारी केलेले भारतीय याची नोंद घेऊन भारतीय पद्धतीच्या पारंपरिक पोषक अन्नाचा स्वीकार करतील का ? |