कोरोना महामारीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा स्तर ४ मध्ये समाविष्ट

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) १२.७ टक्के आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील स्तररचनेनुसार ४ थ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्ह्याकरता २८ जूनला सकाळी ७ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत कोरोनाच्या अनुषंगाने सुधारित आदेश लागू केले आहेत, असा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिला आहे.

या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील, तर शनिवार आणि रविवार बंद रहातील. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे बंद रहातील. विवाह समारंभ अधिकाधिक २५ लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्ययात्रा आणि अंत्यविधी यांना अधिकाधिक २० लोकांना उपस्थित रहाता येणार आहे. ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय असेल, अशी बांधकामे चालू रहातील. वाहनचालकासह ३ व्यक्ती आणि प्रवाशांसाठी लागू असलेले सर्व नियम पाळून माल वाहतूक चालू ठेवता येणार आहे. यांसह अन्य नियम लागू आहेत.