पणजी, २८ जून (वार्ता.) – नवीन शैक्षणिक वर्षात शाळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांसमोरची इंटरनेट जोडणी न मिळणे, ही समस्या अद्याप सुटलेली नाही. संपूर्ण गोव्यातील विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यंदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पालकांनी त्यांच्या मुलांसाठी ‘लॅपटॉप’ आणि ‘स्मार्टफोन’ खरेदी केले आहेत; परंतु कित्येक विद्यार्थ्यांना इंटरनेट जोडणी मिळण्यासाठी गावातून दूरवरच्या ठिकाणी जावे लागत आहे.
पर्ये येथील भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला जंगलात बसून ‘ऑनलाईन’ परीक्षा द्यावी लागते. गेल्या आठवड्यात भाजपच्या महिला मोर्च्याच्या सावित्री कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केपे आणि सांगे भागांत इंटरनेट जोडणी मिळत नसल्याची कल्पना दिली होती. यावर ‘या भागातील बीएस्एन्एल् आस्थापनाचे मनोरे कार्यान्वित केले जातील,’ असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना दिले होते.
इंटरनेट जोडणी मिळण्यासाठी गोव्यातील विविध पंचायत क्षेत्रांमध्ये मनोरे (टॉवर्स) उभारण्याची आवश्यकता आहे; परंतु अनेक पंचायतींनी मनोरे उभारण्यास अनुमती दिलेली नाही; कारण मनोरा उभारल्यानंतर त्याच्यातून निघणार्या लहरींचा वाईट परिणाम होतो, असे त्यांना वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी मनोरे बांधून जोडणीविषयक कार्यक्षमता वाढवणे, हे शासनापुढे आव्हान आहे.
शासनाने इंटरनेट न मिळण्याविषयीची समस्या १५ दिवसांत सोडवावी ! – सुदिन ढवळीकर
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘गेल्या विधानसभेत शून्य तासाच्या वेळी मी मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांना इंटरनेट जोडणी मिळत नसल्याविषयी विचारले होते. त्या वेळी त्यांनी ‘ऑनलाईन वर्ग पर्यायी आहेत’, असे उत्तर दिले; परंतु सध्याची स्थिती पहाता ‘ऑनलाईन शिक्षण’ सक्तीचे झाले आहे.’’ ‘विद्यार्थ्यांची इंटरनेट जोडणी न मिळण्याविषयीची समस्या शासनाने पुढील १५ दिवसांत सोडवावी, नाहीतर आम्ही पणजी येथील आझाद मैदानात निदर्शने करू’, अशी चेतावणी श्री. सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे.