डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले आरोग्य कर्मचार्यांचे आभार
पणजी, २२ जून (वार्ता.) – देशभरात कोरोना लसीकरणामध्ये गोवा पहिल्या क्रमांकावर आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मी ‘टीका (लसीकरण) उत्सव-३’ यशस्वी केल्याप्रीत्यर्थ आधुनिक वैद्य, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि गोमंतकीय यांचे आभार व्यक्त करतो.’’
गोव्यात १८ वर्षेे आणि त्याहून अधिक वयोगटाची लोकसंख्या ११ लक्ष आहे. यातील आतापर्यंत १ लक्ष १ सहस्र ८९८ लोकांनी कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत, तर ५ लक्ष ५६ सहस्र ७७८ लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यशासनाने कोरोना लसीकरणासाठी राबवलेल्या ‘टीका उत्सवा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिक पुढे आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘३० जुलैपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस १०० टक्के जनतेला दिला जाईल. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हे एकच माध्यम आहे.’’
गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी ‘टीका (लसीकरण) उत्सवा’च्या माध्यमातून प्रत्येक गोमंतकियाचे कोरोना लसीकरण होईल, तेव्हाच राज्यातील पर्यटन उद्योग चालू होणार आहे’, असे यापूर्वीच म्हटले आहे.