विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्याविषयी पुरस्कारासाठी निवड !
हिंगोली – येथील ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’चे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना हरियाणा येथील ‘अलर्ट नॉलेज सर्व्हिसेस एज्युकेशन संस्थे’द्वारे दिला जाणारा ‘ग्लोबल प्रिन्सीपल अवॉर्ड’ घोषित करून २२ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य भारद्वाज यांनी दळणवळण बंदीच्या काळात तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे यांचा प्रभावी उपयोग करून शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. नाविन्यपूर्ण संकल्पना आणि विविध कृतीशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवर जनजागृती केल्याविषयी प्राचार्य भारद्वाज यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हरियाणा येथील ए.के. एस्. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण व्यवस्थापन आणि संशोधन यांमध्ये काम करणार्या संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण अन् कौशल्याधिष्ठित उपक्रम राबवणार्या प्राचार्यांना प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यासाठी ११० पेक्षा अधिक देशांतील २ सहस्रांहून अधिक प्राचार्यांनी नामांकन दिले होते. त्यामध्ये प्राचार्य भारद्वाज यांना हा पुरस्कार घोषित झाला.