कोरोना संपेपर्यंत सर्वसामान्यांसाठी मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

विजय वडेट्टीवार

मुंबई – कोरोना संपेपर्यंत मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही, असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मुंबईतील लोकल रेल्वे कधीपासून चालू होणार ? याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले.

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी २ दिवसांपूर्वी ‘मुंबईतील कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल रेल्वे गाड्यांचा विचार करावाच लागेल’, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबल्यानंतर कि कोरोनाचे प्रमाण न्यून झाल्यानंतर मुंबईमध्ये लोकल रेल्वे चालू करण्यात येणार ? याविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यातून लोकल रेल्वेगाड्या चालू करण्याविषयी सरकारची भूमिका अद्याप निश्‍चित झालेली नाही.