शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजप यांच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद  

कुडाळ येथे शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीचे प्रकरण

कुडाळ – शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त अल्प दरात पेट्रोल विक्री करण्यावरून कुडाळ येथे शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीच्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजप यांच्या एकूण ४० कार्यकर्त्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

१९ जून २०२१ या दिवशी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘१०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल’, अशी घोषणा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली होती. त्यानुसार कुडाळ शहरातील एका पेट्रोलपंपावर आमदार नाईक आणि शिवसैनिकांनी पेट्रोल देण्याविषयी कृती चालू केली. त्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला असता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हातघाईवर आले होते. अखेर पोलिसांनी यात हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. या वेळी पोलीस अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत भाजपने आमदार नाईक यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.