कोरोना महामारीच्या विरोधात जागतिक लढ्यात योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ! – श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री


पणजी, १९ जून (वार्ता.) – कोरोना महामारीच्या विरोधात जागतिक लढ्यात योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जीवघेणी महामारी आटोक्यात आणण्यासाठी ‘योग’ प्रभावी ठरल्याची स्वीकृती जगाने दिली आहे, असे मत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून गोवा आरोग्य खात्याच्या आयुष विभागाने ‘गोवा योग अकादमी’ यांच्या सहकार्याने सिद्ध केलेल्या चित्रफितीच्या प्रकाशनप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. या कार्यक्रमाला गोवा आरोग्य खात्याच्या आयुष विभागाचे उपसंचालक डॉ. दत्ता भट, गोवा योग अकादमीचे मिलिंद महाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘युनो’ने ७ वर्षांपूर्वी योगाला जागतिक दर्जा देतांना ‘२१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून मानला जावा’, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ‘योग’ ही जगाच्या कल्याणार्थ भारताने दिलेली देणगी आहे. शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारे ‘योग’ हे एक साधन आहे.’’

‘जेथे आपण, तेथे योग’ या संकल्पनेवर यंदा योग दिवस साजरा करणार

श्रीपाद नाईक

‘कोरोना महामारीमुळे यंदा २१ जून या दिवशी ‘जेथे आपण, तेथे योग’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाने स्वत: घरीच किंवा जेथे आहे तेथे योगदिन साजरा करावा’, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सिद्ध केलेल्या विशेष चित्रफितीचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. यामध्ये योग तज्ञांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली आहेत. ‘कुटुंबातील प्रत्येकाने ही चित्रफीत पाहून योगासने करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे’, असे आवाहन या वेळी करण्यात आले.