सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या नामजपादी उपायांमुळे हरिद्वार कुंभमेळ्यात पंचमहाभूतांचा कोप नियंत्रणात आल्याची प्रत्यक्ष अनुभूती येणे

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘वर्ष २०२१ च्या हरिद्वार महाकुंभमेळ्यात एप्रिल मासात प्रतिदिन दुपारी १ ते सायंकाळी ५ या कालावधीत वेगवान वायूसह रेती वहायची (वादळ यायचे); परंतु त्याचा सनातन संस्थेने कुंभमेळ्यात उभारलेल्या ‘धर्मशिक्षणाच्या प्रदर्शना’वर आरंभीचे २ आठवडे परिणाम झाला नाही. १६.४.२०२१ या दिवशी मात्र संध्याकाळी ५.५५ मिनिटांनी वादळी वारे वहाण्यास आरंभ झाला. रात्री ७.४० पर्यंत या वादळी वार्‍याने रौद्ररूप धारण केले होते. सनातनच्या धर्मशिक्षण प्रदर्शनाच्या पहिल्या २ मंडपांच्या कनाती फाटल्या. तसेच कनातीवर लावलेल्या फलकांची शिवण उसवली गेली. प्रदर्शनात भूमीवर अंथरलेली प्लास्टिकची आच्छादने (मॅटिंग्ज) रेतीमय झाली. विजांचा कडकडाट चालू असल्याने सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने खोक्यांमध्ये बांधून सुरक्षित ठिकाणी हालवावी लागली. वेगवान वार्‍यामुळे प्रदर्शनाचा मंडप पडू नये; म्हणून बाजूने हवाबंद करण्यासाठी लावण्यात आलेले ‘टार्पाेलीन’ही काढावे लागले. रात्री ७.४५ वाजता ही सर्व परिस्थिती सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना सांगितल्यावर त्यांनी साधकांना ‘श्री निसर्गदेवो भव’ हा जप करण्यास सांगितला, तसेच त्यांनी स्वतः गोवा येथून नामजपादी उपाय करण्यास आरंभ केला.

(‘मला कुंभमेळ्याच्या येथील वादळाच्या संकटाची स्पंदने माझे डोके आणि तोंडवळा यांवर आलेल्या आवरणाच्या रूपात जाणवली. मी ते आवरण दूर होण्यासाठी जप शोधला असता ‘महाशून्य’ हा जप मिळाला. मी माझ्या एका हाताचा तळवा सहस्रारचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा आज्ञाचक्रावर ठेवला आणि महाशून्य हा जप करून लागलो, तसेच मी मधे मधे माझे डोके आणि तोंडवळा यांवर जाणवत असलेले आवरण दूर करत होतो. १५ मिनिटे हे उपाय केल्यावर मला तो त्रास ९० टक्के दूर झाल्याचे जाणवले; म्हणून मी रात्री ८ वाजता दूरभाष करून हरिद्वार येथील साधकांना त्याविषयी विचारले.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ)

रात्री ८ वाजता अचानक वादळी वार्‍यामध्ये घट होऊ लागली. त्याच वेळी दूरभाषवरून सदगुरु डॉ. गाडगीळकाका यांनी सांगितले, ‘‘आध्यात्मिक दृष्टीने आता वादळाची तीव्रता केवळ १० टक्के उरली आहे आणि पुढील ५ मिनिटांत वादळी वारा थांबेल.’’ प्रत्यक्षात तेव्हा आम्हाला वादळी वार्‍याची क्षमता २५ टक्के एवढी वाटत होती; परंतु पुढील ७ – ८ मिनिटांत खरोखरच वादळी वारे पूर्णतः थांबले. यातून लक्षात आले की, सूक्ष्मातून एखादी घटना आधी घडते आणि नंतर स्थुलातून त्याचे परिणाम दिसतात.

श्री. चेतन राजहंस

त्यानंतर दुसर्‍या दिवशी (१७.४.२०२१) शनिवार असल्याने भाविकांची धर्मशिक्षणाच्या प्रदर्शनात गर्दी असण्याची शक्यता होती. त्यामुळे सकाळी साधकांनी पुन्हा कनाती बांधल्या, टार्पाेलीन लावले आणि फलक शिवले आणि भूमीवर अंथरलेली रेतीमय झालेली आच्छादने स्वच्छ केली. प्रदर्शन सकाळी १० वाजता पूर्ववत् झाले. दुपारी १२ वाजता मात्र पुन्हा विजांचा गडगडाट आणि वादळी वारे वाहू लागले. त्याची तीव्रता आदल्या दिवशीप्रमाणेच होती. त्याच वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना याविषयी कळवल्यावर त्यांनी नामजपादी उपायांना आरंभ केला.

१० मिनिटांनी त्यांनी दूरभाषद्वारे कळवले की, ५ मिनिटांत वादळी वारा थांबेल. त्या वेळी खरोखर वादळी वारा थांबण्यास आरंभ झाला होता. पुढील ५ मिनिटांत वादळी वारा पूर्णतः थांबला.

‘पंचमहाभूतांनाही संतांच्या आध्यात्मिक साधनेने नियंत्रित करता येते’, याची आम्ही प्रथमच अनुभूती घेतली.’

– श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक