संतांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
१. प्रस्तावना आणि उद्देश
‘संतांचे जीवन अद्भूत असते. संत जसजसे ईश्वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. हे पालट होतात कारण साधनेमुळे त्यांच्यात सत्त्वगुण वाढतो. संतांच्या गुणांतील पालटांसह त्यांच्या शरिरामध्येही स्थुलातून पालट होतात. त्यांच्यातील दैवीपण स्थुलातूनही दिसू लागते; म्हणूनच याला ‘दैवी पालट’ म्हणतात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. ‘अशा ‘दैवी पालटां’चा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘परात्पर गुरु’पदावरील ‘समष्टी संत’ आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्याकडून वातावरणात चैतन्य सतत प्रक्षेपित होत असते. परात्पर गुरु डॉक्टरांमधील चैतन्याच्या प्रभावाने त्यांचा देह (केस, नखे, त्वचा इत्यादी), त्यांच्या दैनंदिन उपयोगातील वस्तू (अंघोळीचा साबण, दाढीचे पाते, सदरा-पायजमा, चपला इत्यादी), तसेच त्यांचे वास्तव्य असलेली खोली आणि त्या खोलीतील साहित्य (खोलीच्या भिंती, खोलीतील आरसा इत्यादी) चैतन्याने भारित झाले आहे. यांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात आलेल्या विपुल संशोधनातूनही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.
मे २०२१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नखे आणि त्वचा यांच्यातील मळामधून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे त्यांच्यातील (मळातील) सूक्ष्म स्पंदनांवरून लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळखवाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या आणि उजव्या पायांच्या नखांमधील मळ, तसेच त्यांच्या त्वचेवरील मळ यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
२ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे : सर्वसाधारण व्यक्तीच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच आढळून आली नाही, उलट त्यामध्ये (मळामध्ये) पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढील सारणीतून लक्षात येते.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे : मानवाच्या देहावरील मळ तमप्रधान असल्याने त्यामध्ये सात्त्विकता असण्याची सुतराम शक्यता नसते; पण परात्पर गुरु डॉक्टरांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्ये मात्र पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता आहे. त्या मळांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २४९ ते ३५५ मीटर, म्हणजे पुष्कळ अधिक असल्याचे चाचणीतून दिसून आले. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळही चैतन्याने भारित झाला आहे. त्या मळांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सात्त्विकता आहे, तर प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये किती अधिक प्रमाणात सात्त्विकता असेल !
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या पायाच्या नखांपेक्षा त्यांच्या उजव्या पायाच्या नखांमधील मळामध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : शरिराच्या उजव्या भागावर सूर्यनाडीचा (पिंगला नाडीचा) आणि डाव्या भागावर चंद्रनाडीचा (इडा नाडीचा) प्रभाव असतो. सूर्यनाडी अग्नीतत्त्वाची, तर चंद्रनाडी आपतत्त्वाची निर्देशक आहे. त्यामुळे सूर्यनाडी तेजस्वी, तर चंद्रनाडी शीतल असते. सूर्यनाडी तेजस्वी असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या पायापेक्षा उजव्या पायामध्ये अधिक प्रमाणात शक्ती (चैतन्य) आहे.
त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाच्या नखांपेक्षा त्यांच्या उजव्या पायाच्या नखांमधील मळामध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील श्रीविष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत झालेले असणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार आहेत’, असे सप्तर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये ५ टक्के श्रीविष्णुतत्त्व आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहावरील मळासारख्या गोष्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारी सात्त्विकता हेच सिद्ध करते की, त्यांच्यातील श्रीविष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत झालेले आहे.’
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.५.२०२१)
ई-मेल : [email protected]
घटकाची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासण्याचा हेतू‘एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते; म्हणून या चाचण्या करण्यात आल्या.’ |
|