‘सुश्रुत’ रुग्णालयातील कर्मचार्यांचा गलथानपणा रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याने कारवाई करण्याची युवकाची मागणी
प्रशासकीय अनास्थेमुळे युवकावर आत्महत्या करण्याची वेळ येणे संतापजनक आहे. संवेदनशील प्रकरणावर त्वरित उपाययोजना न काढणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
सोलापूर – बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांच्या ‘सुश्रुत’ रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील कर्मचार्यांचा गलथानपणा रुग्णांच्या जिवावर बेतत असल्याने या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करत १४ जून या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संदीप सुतार या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच संदीप सुतार या युवकाला कह्यात घेतल्याने अनर्थ टळला.
१. १३ एप्रिल २०२१ या दिवशी संदीप सुतार यांच्या आई आशा सुतार यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. सुमारे १६ दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना ‘निमोनिया’ झाल्याचे संबंधित रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. ‘या रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील कर्मचार्यांविषयी तक्रार करूनही डॉ. संजय अंधारे त्यांना पाठीशी घालत आहेत. या रुग्णालयाची कोविड मान्यता रहित करून सुश्रुत या रुग्णालयाची सखोल चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. याविषयी संदीप सुतार यांनी २ जून या दिवशी पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले होते. (नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी जनतेला लोककल्याणकारी राज्य देतील का ? – संपादक)
२. बार्शी येथील डॉ. अंधारे यांच्या सुश्रुत रुग्णालयातील कर्मचार्यांकडून होत असलेल्या गलथानपणाविषयी, तसेच दायित्वशून्यतेविषयी नातेवाइकांनी यापूर्वी निवेदन दिले होते. या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘चौकशी करून कारवाई करू’, असे आश्वासन दिले होते; मात्र तरीही संबंधित रुग्णालयावर कारवाई होत नसल्याने संदीप सुतार या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
निवेदनात करण्यात आलेली मागणी
रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागातील कर्मचारी मध्यरात्री १ ते पहाटे ५.४५ या वेळेत झोपी जातात. या काळात गंभीर रुग्णांची देखभाल केली जात नाही. या वेळेत एखादा रुग्ण दगावल्यास त्या रुग्णांच्या संदर्भात नोंदवलेली महत्त्वाची निरीक्षणे फाडून टाकली जातात.