पणजी, १४ जून (वार्ता.) – राज्यात १४ जून या दिवशी सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. हवामान खात्याने १४ जूनप्रमाणे १५ जून या दिवशीही ‘रेड अॅलर्ट’ घोषित करून मुसळधार पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात प्रतिघंटा ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पेडणे येथे सर्वाधिक म्हणजे दुपारनंतर पुढील ३ घंट्यांत ३२.६ मि.मी., म्हापसा २४ मि.मी., पणजी २२ मि.मी., काणकोण २१.५ मि.मी., जुने गोवे ८.५ मि.मी., मुरगाव ७ मि.मी. आणि वाळपई सर्वांत कमी ४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभरात (सकाळी ८.३० नंतर) एकंदरीत पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे. पणजी ३५ मि.मी., पेडणे ७७ मि.मी., वाळपई २१ मि.मी., जुने गोवे १३.५ मि.मी., म्हापसा ३२.५ मि.मी., मुरगाव २० मि.मी. आणि काणकोण २४ मि.मी. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पुरसदृश स्थिती निर्माण होणे, पाणी किंवा वीजपुरवठ्यावर परिणाम होणे, झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, पिकांची हानी होणे आदी शक्यता वर्तवण्यात आली आहे.