जिल्ह्यात स्तर-४ च्या निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – शासनाने १० जूनच्या आदेशानुसार कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन खाटांच्या वापराविषयीची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे साप्ताहिक प्रमाण जिल्ह्यात ११.८९ टक्के असून ‘ऑक्सिजन खाटां’च्या वापराची टक्केवारी ५१.५९ टक्के इतकी आहे. सद्य:स्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या अनुषंगाने ‘जिल्हा स्तर-४’मध्ये असल्यामुळे जिल्ह्याला लागू करण्यात आलेल्या स्तर-४ च्या निर्बंधांच्या आदेशाला १४ जून या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी १२ जूनला दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू : ५६६ नवीन रुग्ण
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाबाधित १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८६७ झाली आहे. तसेच ५६६ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि दिवसभरात २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६ सहस्र ९०४ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. २६ सहस्र ४४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३४ सहस्र २२१ झाली आहे. उपचार चालू असलेल्या ४९ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.