करीना खान यांच्यावर बहिष्कार !

ट्विटरवर ‘#बॉयकॉटकरीनाखान’ हा ‘ट्रेंड’ १ दिवस अग्रस्थानी होता. निमित्त होते रामायण चित्रपटातील माता सीतेच्या भूमिकेविषयी अभिनेत्री करीना यांनी मागितलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम ! यापूर्वी निर्मात्यांनी करीना यांना १० कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते; मात्र आता करीना यांनी १२ कोटी मागितल्याने चित्रपट लांबणीवर पडला आहे. याविषयी लोक संतप्त झाले असून त्यांनी ‘रामायण कधी न वाचलेल्या करीना खान यांना ही भूमिका देण्यात येऊ नये, केवळ हिंदु अभिनेत्रीलाच ही भूमिका देण्यात यावी’, अशा मागण्या केल्या आहेत. सामाजिक माध्यमांवर लोक सक्रीय असून खटकलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी पुढाकार घेऊन मोहीम राबवतात, हे या घटनेतून लक्षात येते. या मोहिमांच्या परिणामस्वरूप संबंधितांना निर्णयही पालटावा लागला आहे. स्वत:च्या मुलाचे तैमूर हे नाव ठेवणार्‍या आणि त्याविषयी भारतियांनी लक्षात आणून देऊनही त्याचे समर्थन करणार्‍या करीना यांची सीतामातेच्या भूमिकेसाठी निवडच कशी झाली ? हे लक्षात येत नाही. यातून निर्मात्याचीही वैचारिक दिवाळखोरी दिसून येते. निर्माते, दिग्दर्शक झोपले असले, तरी लोक जागे आहेत. लोकांनी ठरवले, तर ते चांगली भूमिका घेऊन आणि संख्याबळावर निर्णय फिरवू शकतात. जनतेने त्यांची या चित्रपटाविषयीची मागणी लावून धरून रामायणाचा गौरव राखावा, हीच अपेक्षा !