सरकारने पायी वारीसाठी निर्णय जाहीर करावा ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज

सोलापूर, १३ जून (वार्ता.) – आषाढी वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे आषाढी वारी पायीच व्हायला हवी. सरकारने वारीविषयी सध्या घोषित केलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निर्णयामध्ये त्वरित पालट करून पायी वारी होण्यासाठी सरकारने अनुमती द्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून येत्या १६ जून या दिवशी सोलापूर येथे भजन आंदोलन करणार आहोत. त्यानंतरही निर्णयामध्ये पालट न झाल्यास आझाद मैदान येथे आंदोलन करू, अशी चेतावणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली आहे.

या वेळी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले की, देहली येथील पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालय येथे याविषयी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याविषयी नोंद घेऊन जे.जे. वाळवे या अधिकार्‍यांची यासाठी नियुक्ती केली असल्याचा परतावा दिला आहे.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव सरकारच्या सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोना संसर्गामुळे कुणीही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली नाही. सरकारला आतापर्यंत सहकार्यच केले आहे.

मागील वर्षी कोरोना संसर्गाची परिस्थिती वेगळी होती. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांचे निर्बंध होते. सध्या रुग्णसंख्याही पुष्कळ अल्प होत आहे. आषाढी वारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणार्‍या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी आणि पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी अन् नियम घालून अनुमती द्यावी, तसेच लवकरात लवकर पायी वारी संदर्भात निर्णय घोषित करावा.

अल्प उपस्थितीत पायी वारी करता येणे शक्य होते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

अल्प उपस्थितीत पायी वारी करता येणे शक्य होते. सरकारने याविषयी थोडा विचार केला असता, तर निश्‍चितपणे ते शक्य झाले असते. वारकरी मंडळींनी केवळ ५० जणांना समवेत घेऊन पायी वारीसाठी अनुमती मागितली होती. यासमवेतच त्यांनी मार्गावरील सगळ्या गावांचे ठरावही घेतले होते. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी होऊ शकली असती, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.


‘पायी वारीसाठी अनुमती मिळावी’, हा वारकर्‍यांचा प्रस्ताव शासनाने संमत करायला हवा होता ! – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे

मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथून निघणार्‍या संत मुक्ताबाई वारीची अनेक वर्षांची परंपरा आहे. ‘पायी वारीसाठी अनुमती मिळावी’, हा वारकर्‍यांचा प्रस्ताव शासनाने संमत केला असता, तर अधिक बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.