किल्ल्यांच्या संवर्धनाविषयीच्या सूचना पाठवण्याचे आवाहन
मुंबई – राज्यातील गड आणि किल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पावले उचलण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने १३ जून या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील २५० दुर्गप्रेमींशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला. या वेळी किल्ले आणि गड यांच्या संवर्धनाविषयी काही सचूना असल्यास मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘[email protected]’ या ई मेलवर पाठवण्याचे आवाहन त्यांनी दुर्गप्रेमींना केले.
या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले, तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे आणि दुर्गप्रेमी गिरीश टकले यांनी त्यांचे विचार प्रातिनिधिक स्वरूपात मांडले. या बैठकीला संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दुर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडचणींचा पाढा वाचत होतो; पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ? ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे आणि किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा सिद्ध करावा. राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.’’