७० रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू नाही कि डोळे काढावे लागले नाहीत !
कोरोना, काळी बुरशी आदी रोगांवर जर आयुर्वेदीय औषधांचा चांगला परिणाम होत असेल, तर केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून यावर अधिक संशोधन करून या औषधांचा संपूर्ण देशात अधिकृतरित्या वापर करण्यास अनुमती दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सूरत (गुजरात) – गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या न्यून होत असली, तरी काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत हा आजार झालेले ७ सहस्रांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यांतील २०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३५० हून अधिक रुग्णांचे डोळे काढण्यात आले आहेत. या आजाराच्या रुग्णाला प्रतीदिन ३० सहस्र रुपयांचे इंजेक्शन देऊनही त्याच्यावर विशेष परिणाम होत नसल्याचेही दिसून येत आहे. दुसरीकडे काळ्या बुरशीवर आयुर्वेदीय औषधांचा चांगला परिणाम होत असल्याचेही चित्र आहे. सूरत येथील रजनीकांत पटेल या आयुर्वेदीय वैद्यांनी काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या ७० रुग्णांवर उपचार केले. या ७० रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झाला नाही, तसेच कुणालाही शस्त्रकर्म करावे लागले नाही. यासह खराब झालेले डोळे आणि जबडे बरेही झाले. अनेकांना दिसणे बंद झाले होते त्यांना आता दिसूही लागले आहे.
१. आयुर्वेदमध्ये या रोगाला ‘काळी बुरशी’ म्हटले जात नाही. त्याला ‘कृमी’, ‘कुष्ठ’, ‘अस्थि मज्जा गति कुष्ठ’, ‘गलित कुष्ठ अस्थिराय’ या नावांनी ओळखले जाते. हा रोग फार जुना असून आयुर्वेदात त्यावर ३ सहस्र वर्षांपासून उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदीय औषध घेतांना पथ्य पाळणे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे या रोगावर उपचार करतांना ऊंटणीचे दूध न पिणे, कच्चे केळे न खाणे, पडवळाची भाजी न खाणे, लाल तांदूळ, तसेच गोड आणि आंबट पदार्थ न खाणे आदी पथ्ये पाळावी लागातात.
२. वैद्य रजनीकांत पटेल म्हणाले, ‘‘काळी बुरशी नष्ट करण्यासाठी विडंग, भल्लातक, उसीर, फलास, सिगरू, चित्र आदी वनस्पतींचा वापर केला जातो. या वनस्पतींच्या चुर्णाचा धूर नाकावाटे घेऊन तोंडातून बाहेर काढला जातो, तसेच तोंडावाटे घेऊन नाकावाटे बाहेर काढला जातो. अशाच प्रकारे अन्य वनस्पतींद्वारे बनवलेले औषधही नाकात घातले जाते. अन्य औषधे तोंडावाटे घेण्यास सांगितले जाते. यामुळे ५० टक्के लाभ होतो, तर उर्वरित ५० टक्के लाभ हा पथ्ये पाळल्याने होतो.’’