आषाढीच्या वारीला केवळ महत्त्वाच्या १० पालख्यांना अनुमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

या वर्षीही आषाढी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद 

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी वारीसाठी पायी जाण्यास अनुमती देण्यात आलेली नाही; मात्र महत्त्वाच्या १० पालख्यांना अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ जून या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देतांना अजित पवार म्हणाले, ‘‘१० मानाच्या पालख्या आणि वारकरी २० बसगाड्यांतून पंढरपूरला जातील. देहू आणि आळंदी येथील पालखी प्रस्थान सोहळ्याला १०० वारकर्‍यांना उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात येणार आहे. उर्वरित ८ पालखी प्रस्थान सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकर्‍यांना उपस्थित रहाण्याची अनुमती असेल. कोरोनाविषयीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक असणार आहे. शासकीय महापूजेचा कार्यक्रम मागील वर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल.’’