कोल्हापूर, १० जून – मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर येथे १६ जून या दिवशी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याच्या ३६ जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जाईल. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली. ते १० जून या दिवशी कोल्हापूर येथे मराठा समन्वयकांच्या बैठकीत बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी २५ जूनला मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषद !
सांगली – मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी नवी मुंबई या ठिकाणी २५ जून या दिवशी राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यातील, तसेच केंद्रातील अनेक आजी-माजी मंत्री, मराठा समाजातील खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. या गोलमेज परिषदेमध्ये राज्य सरकारची पोलखोल करण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि सरकारच्या विरोधात निर्णायक लढ्याची घोषणा होणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक, वैभव शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.