समाजाला साधना शिकवण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित प्रयत्न करावेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर आणि पूर्वाेत्तर भारतातील मठ-मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि पुरोहित यांची ‘ऑनलाईन’ बैठक

  • हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी – कोरोना वैश्विक महामारी चालू असतांनाच भारतात आलेल्या चक्रीवादळासारख्या समस्यांमुळे आज संपूर्ण समाज आपत्काळ अनुभवत आहे. अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी ईश्वरावरील श्रद्धा आणि भक्ती वाढवली पाहिजे. साधना केल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढते. ‘न मे भक्तः प्रणश्यति’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) या वचनाप्रमाणे ईश्वर त्याच्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांना नामजप आणि साधना यांचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. समितीच्या वतीने मठ-मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि पुरोहित यांची ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ओडिशाचे स्वामी अखिलानंद, ओडिशाच्या मानस मंदिर परिषदेचे श्री. राजकुमार शुक्ला, वाराणसी येथील कालभैरव मंदिराचे श्री. अवशेष पाण्डेय, बिहारच्या गरीबनाथ मंदिराचे महंत विनय पाठक, आसामच्या कामाख्या मंदिराचे श्री. कवींद्र प्रसाद शर्मा आदी मंदिरांचे प्रतिनिधी, पुजारी आणि पुरोहित उपस्थित होते. उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम, झारखंड आणि बंगाल येथील अनेक विश्वस्त, पुजारी अन् पुरोहित उपस्थित होते.

१. समितीचे समन्वयक श्री. शंभू गवारे म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूंच्या विरोधात स्वतःला आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी सनातन संस्थेने सांगितल्यानुसार नामजप केल्यामुळे समाजाला चांगला लाभ होत आहे. आज अनेक रुग्णालये आणि औषधांची दुकाने यांठिकाणी हा नामजप लावण्यात येत आहे. त्यामुळे मनोबल वाढण्यास साहाय्य होत आहे.’’

२. समितीचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘या आपत्कालीन परिस्थितीत मंदिरांचे संघटन होण्यासाठी मंदिरांमध्ये कोरोनाकाळात आध्यात्मिक बळ वाढवणारा नामजप लावणे, नियमित अग्निहोत्र करणे, मंदिरांमध्ये धर्मशिक्षण देणारी माहिती लिहिणे, लोकांची श्रद्धा वाढावी आणि त्यांनी धर्माचरण करावे यांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित करणे आदी माध्यमांतून आपण धर्मकार्य करू शकतो.’’

क्षणचित्र

या वेळी मंदिरांकडून कोरोनाबाधितांना कशा प्रकारे साहाय्य करण्यात आले, याविषयी उपस्थित मंदिर प्रतिनिधींनी माहिती दिली. तसेच मंदिरांवर होणार्‍या आघातांना थांबवण्यासाठी प्रभावी संघटन आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले.