साधना न करणार्या एका नातेवाइकांच्या तीव्र आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप, त्यात दिवसेंदिवस झालेली वाढ आणि त्यांच्या घराच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
एका साधिकेचे एक नातेवाईक साधना करत नव्हते. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास होता. साधिकेची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असल्याने तिने बनवलेले सात्त्विक अन्नही त्या नातेवाइकांना ग्रहण करता येत नव्हते. हळूहळू त्यांचे जेवणाचे प्रमाण न्यून होत गेले आणि त्यांनी जेवण फेकून देण्याची भाषा केली. त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण वाढल्याने त्यांना रहात्या घरी रहाणेही शक्य न झाल्याने ते घर सोडून गेले. त्यांनी घर सोडल्यावर तेथे दाब जाणवत होता आणि चित्रिवचित्र आकृत्यांची गर्दी घरात रहात असल्याचे जाणवत होते. तीव्र त्रास असणार्या व्यक्तीने साधना आणि नामजपादी उपाय केल्यास तिचा आध्यात्मिक त्रास हळूहळू न्यून होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नतीही होते. पुढील लेख वाचल्यावर साधना आणि नामजपादी उपाय यांची अनिर्वायता लक्षात येते.
‘आमचे एक नातेवाईक प्रतिदिन आमच्या घरी यायचे. आमचे घर म्हणजे संतनिवास असल्याने त्या नातेवाइकांमधील वाईट शक्तीला घरातील चैतन्याचा पुष्कळ वेळा त्रास व्हायचा. १२.५.२०२० ते २३.९.२०२० या कालावधीत त्यांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता पुष्कळ वाढली होती. त्यामुळे त्यांना संतनिवासात येणे अशक्यच झाले. त्यांनी आमच्या घरी येणे बंद केले. या ५ मासांच्या काळात त्यांना झालेल्या आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप येथे देत आहे. त्यावरून ‘वाईट शक्ती कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या माध्यमातून त्रास देऊन जीवन असह्य करतात ?’, हे लक्षात येऊ शकते. वाईट शक्तींच्या त्रासाच्या समवेत लढण्यासाठी साधना करणेच अनिवार्य आहे.
१. ‘जेवणातील पदार्थ आणि अन्न ग्रहण करणे’ यांसंदर्भात नातेवाइकांच्या आध्यात्मिक त्रासात टप्प्याटप्प्याने झालेली वाढ
१ अ. तिखट खाणे एकदम बंद करून बिनतिखटाचे पदार्थ खाणे : ‘१२.५.२०२० नंतर काही दिवसांनी नातेवाइकांनी जेवणातील तिखट खाणे एकदमच बंद केले. एरव्ही त्यांना लसणाची चटणी, ओल्या खोबर्याची चटणी, ताकातली तळलेली मिरची हे पदार्थ पुष्कळ आवडायचे; मात्र नंतर त्यांनी संपूर्ण जेवणात केवळ मीठ, जिरे, धने पूड आणि कोथिंबीर एवढेच जिन्नस वापरायला सांगितले. त्यामुळे ते जेवण बिनतिखटाचे होऊन त्यांना खाता यायचे.
१ आ. जेवणातील पदार्थांचे प्रमाण न्यून होणे आणि काही वेळा जेवण न गेल्यास नातेवाइकांनी ते पदार्थ टाकून देणे : प्रारंभी त्यांना १ पोळी, १ वाटी भाजी आणि दीड वाटी भात असे जेवण जात होते. जून २०२० पासून जेवण आणखी काही प्रमाणात न्यून झाले. ‘कधीतरी भाजीऐवजी केवळ अर्धा उकडलेला बटाटा खाणे, अर्धी पोळी खाऊन भात टाकून देणे किंवा कधीतरी १ वाटी भात खाऊन पोळी टाकून देणे’, असे ते करायचे.
१ इ. आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण वाढल्याने भूक न लागणे आणि अन्न समोर असूनही ते खाता न येणे : जुलै २०२० पासून आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण आणखी वाढल्याने त्यांना भूकच लागेनाशी झाली. काही वेळा त्यांना पुष्कळ भूक लागायची; पण अन्न समोर असूनही ते त्यांना खाता यायचे नाही. कडधान्यांमध्ये त्यांना केवळ मसूरच चालायचे. ते आम्हाला २ – ३ भाज्या आणायला सांगायचे.
१ ई. सकाळच्या वेळेत जेवणाच्या संदर्भात अनेकदा उलटसुलट निरोप देणे आणि सांगितलेल्या पद्धतीनुसार जेवण न बनवल्यास पुष्कळ ओरडणे : सकाळी उठल्यावर मला भ्रमणभाष करून ‘आज अमुक भाजी कर’, असे ते सांगायचे. त्यातही त्यांचे मन पुष्कळ अस्थिर असायचे. सकाळी ७ ते ९ या वेळेत न्यूनतम ५ वेळा तरी भ्रमणभाष करून जेवणाच्या निरोपाविषयी उलटसुलट पद्धतीने पालट त्यांच्याकडून सांगितले जायचे. त्यानुसार जेवण बनवल्यावरच त्यांना ते आवडायचे. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीत कुठलाही पालट केलेला त्यांना चालत नसे. काही पालट करावा लागल्यास किंवा सांगितलेला एखादा निरोप विसरल्यास भ्रमणभाषवर नातेवाइक मला पुष्कळ ओरडायचे.
१ उ. जेवणाचे प्रमाण आणखी न्यून होणे : १५.८.२०२० या दिवसापासून त्यांचे जेवण एकदमच न्यून झाले. वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना काहीच खाता येत नव्हते. केवळ २ – ३ चमचे भात आणि पोळीचा एखादा तुकडा खाणे, असे जेवण चालू होते. २५.८.२०२० या दिवसापासून ते जेवणात केवळ १ चमचा भात, २ चमचे ओलसर भाजी आणि १ पोळी द्यायला सांगायचे.
१ ऊ. नातेवाइकांनी जेवण फेकून देण्याची भाषा करणे आणि काही वेळा अन्न टाकून देण्याचीही त्यांच्यात शक्ती न उरणे : वाईट शक्तींचा त्रास आणखी वाढल्यामुळे त्यांची बोलण्याची पद्धतही अयोग्य झाली होती. ते ऐकतांनाही त्रासदायक वाटायचे, उदा. १ पोळी दे. मी नाही खाल्ली, तर फेकून देईन. भाजी भरपूर दे. नाही खाल्ली तर फेकून देईन. प्रतिदिन एक बटाटा उकड. नाही खाल्ला, तर फेकून देईन. अशा प्रकारे त्यांचे सतत बोलणे असायचे आणि खरोखरच ते सर्व अन्न फेकून द्यायचे. काही वेळा अन्न टाकून देण्याचीही त्यांच्यात शक्ती नसायची. त्या वेळी ते न गेलेले जेवण माझ्याकडे पाठवायचे. ते पाहून माझ्या लक्षात यायचे की, ते किती अल्प जेवत आहेत. काही वेळा १ चमचा भात एवढेच जेवण संपलेले असायचे.
१ ए. जेवण जात नसल्याने कृश होणे, रागानेच बोलणे आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती त्यांना शक्ती पुरवत असल्याचे लक्षात येणे : जेवण जात नसल्यामुळे ते पुष्कळ कृश दिसत होते. त्यांच्यात चालण्याचीही शक्ती नसायची. त्यांना जे काही सांगायचे असेल, ते रागाने सांगायचे. त्या वेळी सूक्ष्मातील वाईट शक्तीच त्यांना शक्ती पुरवत असल्याचे लक्षात यायचे. त्यामुळे काही वेळा नातेवाईक ३ – ४ घंटे जवळच्या व्यक्तींशी भांडणाच्या स्वरूपातच बोलायचे.
२. नातेवाइकांनी रहात्या ठिकाणाहून निघून जाण्याचे ठरवणे आणि त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तीला साधिकेचा राग येत असल्याचे जाणवणे
आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक झाल्याने आणि नातेवाइकांवर सूक्ष्मातील वाईट शक्तीचेच नियंत्रण अधिक असल्याने त्यांनी रहात्या ठिकाणाहून निघून जाण्याचे ठरवले. त्या कालावधीत नातेवाईक माझ्याशी बोलायचेच नाहीत. ‘त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तीला माझा पुष्कळ राग येत असे’, असे मला जाणवायचे. (साधिकेची पातळी ६१ टक्क्यांहून अधिक असल्याने सूक्ष्मातील वाईट शक्तीला त्यांचा त्रास व्हायचा.’ – संकलक)
३. नातेवाइकांना त्रास देणार्या वाईट शक्तीने दुसर्या नातेवाइकांवरही नियंत्रण मिळवल्याचे जाणवणे
नंतर ४ – ५ दिवस त्यांचे आणखी एक नातेवाइक त्यांच्या समवेत रहायला आले होते. त्या वेळी दुसर्या नातेवाइकांनी तर मला घरातच घेतले नाही. मी त्या दोघांचे जेवण घेऊन गेल्यावर ते केवळ दरवाजाची फट उघडून माझ्या हातातील डब्याची पिशवी घ्यायचे आणि माझ्याशी अवाक्षरही बोलायचे नाहीत. तेव्हा नातेवाइकांना त्रास देणार्या वाईट शक्तीने दुसर्या नातेवाइकांना ‘मी (साधिका) आल्यास घरात घ्यायचे नाही’, असे सांगितले होते’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर ५ दिवसांनी नातेवाइकांनी घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
४. नातेवाइकांनी घरातून जाण्याविषयी कळवणार असल्याचे सांगूनही न कळवणे आणि देवाने सुचवल्याप्रमाणे कृती केल्यावर योग्य वेळी जाऊन त्यांना निरोप देता येणे, त्या वेळी नातेवाइकांनी काहीही न बोलता निघून जाणे
जाण्याच्या दिवशी सकाळी नातेवाइकांनी दुपारी जाणार असल्याचे आम्हाला सांगितले; परंतु ‘निश्चित वेळ नंतर कळवू’, असे म्हटले. त्यामुळे आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पहात होतो. ‘त्यांची निघण्याची सिद्धता झाली असेल’, असा विचार देवानेच दिला. त्याप्रमाणे मी सुनेला त्यांच्या घरी पहायला पाठवले आणि तेवढ्यात त्यांना नेण्यासाठी गाडी आली. आम्ही निरोप देण्यासाठी गेल्यावरही ते नातेवाईक आमच्याशी काहीही न बोलता निघून गेले.
५. नातेवाईक घरातून निघून गेल्यावर त्यांच्या घरात प्रवेश केल्यावर जाणवलेली सूत्रे
नातेवाईक घरातून निघून गेल्यानंतर आम्ही त्या घराची स्वच्छता करण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
५ अ. घरात दाब जाणवणे आणि चित्रविचित्र आकृत्यांची गर्दी घरात रहात असल्याचेही जाणवणे : एखादे घर वर्षानुवर्षे बंद असल्यावर जसे वाटते, तसे नातेवाइकांच्या घरात प्रवेश केल्यावर मला वाटत होते. सर्व दिशांकडून पुष्कळ दाब जाणवत होता. ‘केवळ नातेवाइकांना त्रास देणारी वाईट शक्ती घरातून गेली’, असे नाही, तर आणखी काही चित्रविचित्र आकृत्यांची गर्दी घरात असल्याचे जाणवले. त्यांचे आकार नागमोडी वळणाप्रमाणे होते.
५ आ. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आल्यास जसे वातावरण जाणवते, त्याप्रमाणे वाटत होते.’ (त्या नातेवाइकांचे १६.१०.२०२० या दिवशी निधन झाले.’ – संकलक)
– एक साधिका
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |