विद्युत् कर्मचार्‍यांनी ‘तौक्ते’ चक्रीवादळात केलेले काम कौतुकास्पद ! – सौ. संजना सावंत, अध्यक्षा, जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळात महावितरणची मोठी हानी झाली. या वादळात विजेचे खांब आणि वीजवाहिन्या मोठ्या प्रमाणात तुटून पडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कर्मचार्‍यांसह अन्य जिल्ह्यांतून आलेल्या अतिरिक्त मनुष्यबळामुळे टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत् होत आहे. चक्रीवादळाच्या संकटात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचार्‍यांनी केलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी व्यक्त केले.

चक्रीवादळानंतर वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी स्थानिक कर्मचार्‍यांसह मोठ्या प्रमाणात महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांनी दिवसरात्र एक करून जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून  महावितरणच्या नाटळ, सांगवे विभागीय कार्यालयात विद्युत् कर्मचारी आणि अधिकारी यांचा सत्कार सौ. संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

‘आम्ही केलेल्या कामाची नोंद घेण्यात आली याचा आनंद वाटतो. असे कौतुक नेहमी काम करण्यास प्रोत्साहन देते’, असे उद्गार विद्युत् कर्मचार्‍यांनी काढले. या वेळी चक्रीवादळात हानी झालेल्या नागरिकांना पत्रे आणि ताडपत्री यांचे वाटप करण्यात आले.