‘गुरुदेवांनी चालू केलेले भाववृद्धी सत्संग ही आपत्काळातील जणू  ‘संजीवनी’ आहे’, याची प्रचीती घेणार्‍या बेंगळुरू येथील सौ. तारा !

१. भाववृद्धी सत्संग घेण्यापूर्वी मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होऊन नकारात्मक विचार येणे अन् सत्संगाची पूर्वसिद्धता करतांना त्रास न्यून होऊन हलकेपणा जाणवणे

सौ. तारा

‘मी नामजपादी उपाय करूनही भाववृद्धी सत्संगाच्या दिवशी मला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पुष्कळ त्रास व्हायचे. त्यामुळे माझ्या मनात ‘मला इतका त्रास होत आहे, तर भाववृद्धी सत्संग कसा घ्यायचा ? समष्टीचा लाभ करून घेण्यात मी न्यून पडते. त्यामुळे सत्संग घ्यायला नको’, असे नकारात्मक विचार यायचे. नंतर सत्संगाच्या पूर्वसिद्धतेला आरंभ केल्यावर माझा त्रास न्यून व्हायचा आणि ‘त्रासांशी लढा देऊन मला पुढे जायचे आहे’, या विचाराने परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे माझ्याकडून प्रयत्न व्हायचे. त्यानंतर मला हलकेपणा जाणवून गुरुदेवांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त व्हायची.

२. भाववृद्धी सत्संग घेतांना स्वतःत भाव निर्माण होणे आवश्यक असल्याने प्रत्येक प्रसंगात भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागणे

भाववृद्धी सत्संग घेतांना स्वतःत भाव निर्माण होणे आवश्यक असल्याने मला सतत भाववृद्धीसाठी प्रयत्न करावे लागायचे. देवाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी प्रयत्न करतांना मला सतत प.पू. गुरुदेवांचे स्मरण होऊ लागले. ‘प्रत्येक प्रसंगात ईश्‍वराला कसे पहायचे ?’, हे ईश्‍वरच शिकवत असल्याने माझे भावजागृतीचे प्रयत्न होऊन ‘भगवंतच प्रयत्न करून घेत आहे’, अशी कृतज्ञताही वाटू लागली.

३. भाववृद्धी सत्संग, म्हणजे गुरुदेवांनी साधकांवर केलेला कृपेचा वर्षाव !

मी भाववृद्धी सत्संग घेत असल्याने ‘या सत्संगाने साधकांची भावजागृती होते का ? ती झाली नाही, तर मी कुठे न्यून पडले’, असे कर्तेपणाचे विचार माझ्या मनात यायचे. एकदा भाववृद्धी सत्संग घेतांना अन्य साधकांच्या भावामुळे माझा भाव जागृत होऊ लागला. यातून ‘साधकांच्या भावामुळे स्वतःत भाव निर्माण होतो’, हेही मला अनुभवता आले. त्यामुळे भाववृद्धी सत्संग म्हणजे गुरुदेवांनी आमच्यावर केलेला कृपेचा वर्षावच आहे.

भाववृद्धी सत्संग, म्हणजे भावाची दीप्ती (ज्योत) ।
भाववृद्धी सत्संग, म्हणजे कलियुगातील कल्पवृक्ष ।
भाववृद्धी सत्संग, म्हणजे कलियुगात इच्छित ते देणारी कामधेनू ।
भाववृद्धी सत्संग, म्हणजे ईश्‍वरापर्यंत पोचण्याची जणू संजीवनी ।

गुरुदेवांनी दिलेले हे ‘भाववृद्धी सत्संग’ म्हणजे आपत्काळातील जणू संजीवनी आहे. हे सर्व गुरुदेवांनी शिकवले आणि मला ते अनुभवताही आले. याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता  !

– सौ. तारा, बेंगळुरू (१.११.२०१७)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक