‘सनातन प्रभात’च्या अभ्यासातून व्यावहारिक आणि आध्यात्मिक वाटचाल करणारे वैद्य सुविनय दामले !

कालच्या (२९.५.२०२०) दैनिकात वैद्य सुविनय दामले यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त केलेले मार्गदर्शन वाचले. त्यानंतर काही जुन्या गोष्टी आठवल्या. मी वर्ष १९९५ ते सुमारे २००३ या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अध्यात्मप्रसारासाठी, तसेच अभ्यासवर्ग आणि सत्संग घेण्यासाठी जात असे. तेव्हा श्री. दादा दामले यांच्याशी माझी भेट झाली. नंतर मी कुडाळला गेल्यावर त्यांच्या घरी रहात असे. तेव्हा त्यांचा मुलगा सुविनय यांच्याशी भेट झाली. पुढे सर्वांशीच जवळीक होऊन आमच्यात कौटुंबिक भावना निर्माण झाली. तेव्हापासून आतापर्यंत सुविनय यांनी केलेली व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रगती पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्यात केलेले मार्गदर्शन अप्रतिम आहे. ‘सनातन प्रभात’आणि ‘सनातन संस्था’ यांची आम्हालाही ज्ञात नसणारी अनेक वैशिष्ट्ये त्यांनी या मार्गदर्शनात सांगितली. यांतील काही वाक्ये पुढे दिली आहेत.

१. व्यक्ती आणि समाज यांवर राष्ट्र अन् धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.

२. जसे ‘व्यक्ती १०० वर्षे जगण्यासाठी तिने काय करायचे ?’, हे आयुर्वेद सांगते, तसे सनातन प्रभात ‘१०० वर्षे आनंदी कसे रहायचे ?’, ते शिकवत आहे.

३. ‘सनातन प्रभात’चा जो वाचक झाला, तो धर्मस्थापनेच्या मार्गावरचा सहप्रवासी झाला. त्याला साधक, मुमुक्षू म्हणता येईल.

४. ‘चांगला साधक होण्यासाठी काय करायला पाहिजे ?’, याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’मधून मिळते.

५. ‘सनातन प्रभात’ ज्यांच्या हाती, धर्मसंस्थापना त्यांच्या हाती !

६. उच्च-नीच, धर्म-जाती, गरीब-श्रीमंत असा कोणताच भेद नसणारे एक छत म्हणजे सनातन संस्था आहे.

ही वाक्ये आम्हाला पुनःपुन्हाः वापरता येतील. आजवर अशा स्वरूपाचे लिखाण कुणीच केले नाही. वैद्य सुविनय यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केवळ मलाच वाटते असे नाही, तर कार्यक्रमात उपस्थित दर्शकांनीही अभिप्राय स्वरूपात सांगितले आहे की ‘वैद्य दामले यांचा विषय संपूच नये’, ‘वैद्य दामले सर, आपण अत्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.’ दर्शक, वाचक यांचे असे मत होण्याचे कारण म्हणजे वैद्य सुविनय यांनी केवळ उत्तम वक्ता म्हणून हे मांडलेले नाही, तर त्यांनी स्वतः जे अनुभवले आहे, ते कथन केलेे आहे. यातूनच त्यांची ‘सनातन प्रभात’विषयीची आत्मीयता आणि आदरभाव दिसून येतो.

असे उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे वैद्य सुविनय दामले यांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर व्हावी, यासाठी शुभेच्छा !

                                   आपला,

                          (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

वाचकांना विनंती : ज्या वाचकांना वैद्य सुविनय दामले यांनी केलेले मार्गदर्शन वाचायला मिळाले नसेल, त्यांनी https://sanatanprabhat.org/marathi/481474.html या लिंकवर वाचावे !