कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील ‘सीटी स्कॅन सेंटर’ने ५ जणांकडून अतिरिक्त आकारलेली रक्कम केली परत !

आरोग्य साहाय्य समितीने आवाज उठवल्याचा परिणाम !

सीटी स्कॅन सेंटरकडून होणारी लूटमार थांबवणार्‍या आरोग्य साहाय्य समितीचे अभिनंदन ! अशा लूटमारीच्या विरोधात नागरिकांनी सतर्क राहून वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक !

मुंबई – महाराष्ट्र शासनाने कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार आणि तपासणी यांसाठी दर निश्‍चित केले आहेत. असे असतांनाही कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील ‘कुलकर्णी निदान डायग्नोस्टिक सेंटर’ने महाराष्ट्र शासनाचे नियम डावलून श्री. जयदीप शेडगे आणि त्यांच्या कुटुंबातील ४ सदस्य असे एकूण ५ जणांची ‘सीटी स्कॅन’च्या नावाखाली प्रत्येकी १ सहस्र ५०० रुपयांप्रमाणे ७ सहस्र ५०० रुपये अधिक रक्कम आकारली.

याविषयी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने संबंधित ‘डायग्नोस्टिक सेंटर’कडे पत्रव्यवहार करून योग्य कारवाई करण्यास सांगितले असता त्यांनी आकारलेली अधिकची रक्कम शेडगे कुटुंबियांना परत केली आहे. श्री. शेडगे यांनी ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांच्या ‘सुराज्य की ओर’ या ऑनलाईन कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असल्याचे म्हटले आहे.

१. कोपरखैरणे येथील शेडगे कुटुंबातील एकूण ५ जण कोरोना संक्रमित होते. त्यांच्या सीटी स्कॅन अहवालामध्ये ते कोरोना संक्रमित असल्याचे आणि त्यामुळे त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचेही स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडून प्रत्येकी २ सहस्र ५०० रुपयांऐवजी ४ सहस्र रुपये आकारण्यात आले. म्हणजे प्रत्येकी दीड सहस्र रुपयांप्रमाणे ५ जणांचे एकूण ७ सहस्र ५०० रुपये अतिरिक्त घेण्यात आले.

२. श्री. शेडगे यांनी ‘आरोग्य साहाय्य समिती’कडे यासंदर्भात साहाय्य मागितले असता समितीने त्यांना महाराष्ट्र शासनाच्या २४ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा दाखला देऊन कोरोना रुग्णाच्या सीटी स्कॅनसाठी २ सहस्र ५०० रुपये घेण्याचा नियम असल्याचे सांगितले. समितीने केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री. शेडगे यांनी ‘कुलकर्णी निदान डायग्नोस्टिक सेंटर’कडेे याविषयी तक्रार केली. श्री. शेडगे यांनी तक्रार करतांना डॉक्टरांचे तपासणीसाठीचे पत्र, त्यांचे देयक, तपासणी अहवाल आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय इत्यादी सर्व कागदपत्रे जोडली. या तक्रारीत ‘डायग्नोस्टिक सेंटर’ने दोन दिवसांत निर्णय घेऊन अतिरिक्त रक्कम परत करावी, अशी मागणी केली. ‘आरोग्य साहाय्य समिती’ने या डायग्नोस्टिक सेंटरला सर्व कागदपपत्रे पाठवून श्री. शेडगे यांच्या तक्रारी संदर्भात तातडीने नोंद घेण्यास सूचित केले. त्यानुसार ‘डायग्नोस्टिक सेंटर’ने श्री. शेडगे यांना एकूण ७ सहस्र ५०० रुपये परत केले.

३. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कोरोना रुग्णांच्या छातीचा सीटी स्कॅन केल्यावर २ सहस्र ५०० रुपये एवढे शुल्क आकारणे बंधनकारक आहे. असे असतांनाही सीटी स्कॅनची अतिरिक्त दराने आकारणी करून अनेक सामान्य रुग्णांची फसवणूक केली जात आहे. तरी छातीची सीटी स्कॅन तपासणी करतांना आणि कोरोनाचे अन्य उपचार घेतांना शासन निर्णयानुसार देयक आकारले जात असल्याची निश्‍चिती करावी, असे आवाहन ‘आरोग्य साहाय्य समिती’ने सर्व नागरिकांना केले आहे.