असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी समाजाला योग्य दिशा देऊ शकतील का ?, असा विचार सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पुणे,२७ मे – दत्तात्रय मांढरे यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या नावावर शिवाजीराव भोसले सहकारी अधिकोषातून सवा कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दत्तात्रय मांढरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांची पुष्कळ आवश्यकता असल्याचे सांगत मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदीखत सिद्ध करून त्याद्वारे शिवाजीराव भोसले सहकारी अधिकोषातून प्रथम ८ लाख रुपये कर्ज घेतले. त्यानंतरही मांढरे यांचे कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) आणि बनावट पुरवणी दस्तऐवज सिद्ध करून मांढरे यांच्या अधिकोषातून सवा कोटी रुपये कर्ज काढले; मात्र त्याचे हप्ते न भरता २ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी करत फसवणूक केली आहे.
बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते; पण १ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना काढण्यात आलेले असून त्यांच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यानंतर सदर प्रकरणात त्यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन संमत केलेला असतांना त्यांना परत चौकशीसाठी शिक्रापूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. (पहिल्याच गुन्ह्यात त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती, तर ते पुढचा गुन्हा करण्यास धजावले नसते. पोलीस आणि प्रशासन हे लक्षात घेतील का ? – संपादक)