व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या, मनमिळाऊ, प्रेमभाव, सेवेची तळमळ आदी गुण असलेल्या पुणे येथील साधिका कै. (सौ.) सुवर्णा मुळे (वय ६१ वर्षे) !

१०.५.२०२१ या दिवशी पुणे येथील साधिका कै. (सौ.) सुवर्णा मुळे (वय ६१ वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे कुटुंबीय आणि पुणे येथील सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. (सौ.) सुवर्णा मुळे

१. कै. (सौ.) सुवर्णा मुळे यांचे कुटुंबीय

१ अ. सौ. वनिता मुळे (कै. (सौ.) सुवर्णा मुळे यांची सून), पुणे

१ अ १. प्रेमभाव : ‘सासूबाई मनमिळाऊ होत्या. माझ्याकडून काही चुकले, तरी त्या न चिडता मला नीट समजून सांगायच्या. त्यांच्या मनात कधीच कुणाविषयी राग किंवा तिरस्कार नव्हता. त्या सर्वांवर प्रेम करायच्या. त्यांनी त्यांच्या मुलीत आणि माझ्यात कधीच अंतर केले नाही. त्यांच्याविना रहाण्याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. त्या आमचा पुष्कळ मोठा आधार होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती प्राप्त होवो, हीच प्रार्थना.’

१ आ. सौ. मंजुषा चौधरी (कै. (सौ.) सुवर्णा मुळे यांची मुलगी), पुणे

१ आ १. काटकसरी स्वभाव : ‘रुग्णाईत असतांना तिला जेवण जात नव्हते; म्हणून ती मला ‘थोडेच अन्न दे. अजून लागले, तर मी मागून घेईन’, असे सांगायची. अन्न वाया जाऊ नये, असे तिला वाटायचे.

१ आ २. तळमळ : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यापूर्वी आई दत्तगुरूंची उपासना करायची. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनसुद्धा तिने साधना सोडली नाही.

१ आ ३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य असणे : मागील मासात ती काही दिवस माझ्याकडे रहायला आली होती. पहाटेपासूनच तिची व्यष्टी साधना, प्रार्थना, नामजप चालू असायचे. रुग्णाईत असतांनाही काही दिवस ती माझ्या शेजारील सदनिकेत एकटी होती. तिचा संपूर्ण दिवस नामजप, प्रार्थना, साधना आणि सत्संग यातच जायचा. तिला एकटेपणा अजिबात वाटला नाही.

१ आ ४. मुलीकडूनही साधना करवून घेणे

अ. माझ्या घरी असतांना पहिले दोन दिवस घरी तिनेच देवपूजा केली; पण नंतर तिने मला करायला सांगितली. जेणेकरून देवपूजा करण्यातून माझीसुद्धा साधना व्हावी.

आ. गुरुपौर्णिमेसाठी अर्पण आणि विज्ञापने मिळवणे, याची ती मला वेळोवेळी आठवण करून द्यायची.

इ. तिला दूरभाष केल्यानंतर अवांतर बोलून झाल्यावर ती मला नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करून द्यायची. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील साधनेविषयक आलेली सूत्रे सांगायची. ‘दिवसातून किमान अर्धा घंटा तरी तू नामजप कर’, असा तिचा आग्रह असायचा.

ई. अधिक मासात तिने आम्हाला ‘परात्पर गुरुदेवांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ भेट दिला होता. ‘आमच्या घरीही त्यांचे चैतन्य आणि वास्तव्य असावे’, असा तिचा त्यामागे मानस होता.’

२. पुणेे येथील साधक

२ अ. सौ. प्रतिभा फलफले

२ अ १. नीटनेटकेपणा : ‘काकूंचे रहाणीमान नीटनेटके होते, तसेच त्यांचे सेवेचे साहित्यही नीटनेटके असायचे.

२ अ २. साधनेची तीव्र तळमळ : काकू रहायला लांब होत्या. तेथून बस किंवा रिक्शाने प्रवास करून त्या सत्संगाला यायच्या. वैयक्तिक कारणामुळे त्यांना सत्संगाच्या आरंभीपासून यायला जमायचे नाही, तरीही त्या सत्संग मिळतो; म्हणून सत्संगाला उपस्थित रहायच्या. त्या कोणतीही सवलत न घेता साधनेचे प्रयत्न तळमळीने करायच्या. त्यांनी अनेक वाचकांना जोडून ठेवले आहे. सेवेच्या संदर्भात सांगितलेल्या सूत्रांवर त्या तळमळीने प्रयत्न करीत.

२ अ ३. स्थिरता : रुग्णाईत झाल्यावर काकू स्थिर होत्या. ‘प.पू. गुरुदेव माझ्यासह आहेत’, असा भाव ठेवून त्या आजारपणाला धैर्याने सामोर्‍या गेल्या. आजारपणातही त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय श्रद्धेने केले.’

२ आ. सौ. सोनाली कुलकर्णी

२ आ १. नीटनेटकेपणा : ‘काकू सेवेला येतांना नीट आवरून यायच्या. येतांना सेवेचे आवश्यक साहित्यही आणायच्या. काकूंचे अक्षर अतिशय सुंदर होते. त्यांची साप्ताहिकाची वही अतिशय स्वच्छ, तसेच कुठेही खाडाखोड नसायची.

२ आ २. परिस्थितीचा स्वीकारणे

अ. काकू घरातील परिस्थिती स्वीकारून व्यष्टी साधनेची घडी बसवण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांना शारीरिक त्रास पुष्कळ होता, तरी त्यांनी प्रारब्ध म्हणून स्वीकारले होते. रुग्णाईत झाल्यावर ‘हे माझे प्रारब्ध आहे’, असे म्हणून त्यांनी स्वीकारले होते.

आ. अडचणीमुळे काकूंना ‘ऑनलाईन’ गुरुलीला सत्संग ऐकायला मिळत नव्हता. त्याची त्यांना खंत वाटायची. त्या सत्संगातील सूत्रे नंतर भ्रमणभाष करून विचारून घ्यायच्या.

इ. गुरुकार्याची तीव्र तळमळ : काकू कितीही शारीरिक त्रास झाला, तरी बरे वाटायला लागले की, लगेच सेवेला यायच्या.

ई. व्यष्टी साधनेचे प्रयत्न : २०२० या वर्षी आलेल्या दळणवळण बंदीपासून त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले चालू होते. नामजप, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणी लिखाण नियमित करायच्या. त्या स्वतःच्या चुका विचारून घ्यायच्या.’

२ इ. सौ. अर्चना चांदोरकर

१. परिस्थिती स्वीकारणे : ‘काकूंची आर्थिक स्थिती बेताचीच होती; परंतु काकूंच्या बोलण्यात कधीच परिस्थितीविषयी तक्रार नसायची.

२. काकू तळमळीने सेवा करायच्या. त्यांचे बोलणेही शांत असायचे. काकूंना आध्यात्मिक त्रास होता; पण त्या लगेच त्यावर प्रार्थना करून मात करायच्या. नामजप आणि साधनेचे प्रयत्न करायच्या. त्यांचे भावाच्या स्तरावरचे प्रयत्न पुष्कळ वेगळे आणि चांगले होते.’

३. त्यांच्या बोलण्यात सहजता जाणवायची. काकूंची पहिल्यापासूनच गुरुदेवांवर अपार श्रद्धा होती.’

(क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.