‘व्हनमारेकाकूू वयस्कर असूनही माझी आई रुग्णालयामध्ये असतांना आईच्या समवेत त्या रात्री एकट्या झोपायला असायच्या, तसेच ‘आईचे डायपर (मलमूत्र शोषणारे वस्त्र) पालटणे, तिला औषधे देणे’ इत्यादी सेवा त्या एकट्या करायच्या. आईच्या शेवटच्या १० – १२ दिवसांत तिला स्वतःच्या हाताने खाता येत नसल्याने तिला भरवावे लागायचे. तेव्हा त्यांनी स्वतःहून ‘आईला भरवण्याची सेवा मी करते. तेवढी तरी सेवा मला मिळू दे’, असे सांगून दिवसातून २ वेळा जेवण खोलीत आणून आईला भरवले. आईला जेवण जायचे नाही. त्यामुळे ती खायला सिद्ध नसायची. तिला अगदी लहान मुलाप्रमाणे समजावत प्रेमाने भरवावे लागायचे. त्यामुळे तिला अर्धी वाटी भात भरवायलाही बराच वेळ लागायचा. नंतर तिची जेवणाची भांडीही काकू घासायच्या. त्यांचे वय पहाता या सर्व सेवा त्यांना करणे कठीण असूनही त्यांनी त्या आनंदाने केल्या. मला कधीच त्यांना सेवेची आठवण करून द्यावी लागली नाही किंवा त्यांचा पाठपुरावा घ्यावा लागला नाही. त्यासाठी मी काकूंची ऋणी आहे आणि देवाने काकूंना आईच्या सेवेसाठी निवडले, त्यासाठी त्याच्या चरणी शब्दातीत कृतज्ञता व्यक्त करते. ’
– कु. तृप्ती कुलकर्णी (२४.४.२०२०)