‘२०.२.२०१९ या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मधील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांचे गौरवशाली चरित्र या सदरातील सूत्रे वाचल्यानंतर वर्ष २००० मध्ये घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्म प्रसारसेवेनिमित्त एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असतांना मार्गात येणार्या गावातील साधकांना भेटून मार्गदर्शन करणे आणि त्या वेळी भ्रमणभाषची सुविधा उपलब्ध नसल्याने साधकांना दूरभाषवर निरोप कळवून त्याप्रमाणे साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्वागतासाठी मार्गावर येऊन थांबणे
‘पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्म प्रसारासाठी विविध ठिकाणांना भेटी देत असत. एके ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असतांना मार्गात येणार्या छोट्या-छोट्या गावांतील साधकांना भेटून मार्गदर्शन करीत. त्या वेळी भ्रमणभाषची सुविधा उपलब्ध नसल्याने साधकांना दूरभाषवर निरोप कळवला जायचा आणि त्यानुसार साधक ठराविक ठिकाणी थांबून परात्पर गुरु डॉक्टरांना नियोजित स्थळी घेऊन जायचे.
वर्ष २००० मध्ये एकदा परात्पर गुरु डॉक्टर सावंतवाडीहून कोल्हापूरकडे निघाले होते. त्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे थांबून साधकांना भेटून आणि मार्गदर्शन करून पुढे जाण्याचे नियोजन झाले. गडहिंग्लज येथील श्री विठ्ठल मंदिरात साधकांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले आणि गडहिंग्लज जवळच गिजवणे येथे श्री. संजय चव्हाण यांच्या घरी मध्यान्ह भोजनाचे आयोजन झाले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या आयोजनाच्या संदर्भात प्रसारसेवक आणि साधक यांच्याकडून झालेली चूक
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्वागतासाठी गिजवणेच्या बाहेरील रस्त्यावर त्या वेळचे प्रसारसेवक श्री. आठलेकर आणि केंद्रातील साधक श्री. संजय चव्हाण थांबले होते अन् केंद्रातील इतर साधक श्री विठ्ठल मंदिरात थांबले होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्वागतासाठी श्री विठ्ठल मंदिराबाहेर थांबलो होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे औक्षण करण्याचे नियोजन होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वाट बघत प्रसारसेवक त्या वाटेतच थांबले होते; परंतु त्यांच्या समोरून परात्पर गुरुदेवांची गाडी निघून पुढे केव्हा आली आणि परात्पर गुरु डॉक्टर थेट मंदिरातच केव्हा पोचले, ते कुणालाच समजले नाही. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घेऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि सभागृहात व्यासपिठाकडे गेलो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यासपिठावरील आसंदीत स्थान ग्रहण केले. नियोजनानुसार त्यांचे औक्षण करणारी साधिका वेळेत पोचली नाही आणि गुरुदेवांच्या मार्गदर्शनापूर्वी सांगायचे प्रास्ताविकही राहून गेले; कारण प्रसारसेवक आणि केंद्रसेवक तेथे उपस्थित नव्हते. ‘काय करायचे ?’, ते कुणालाच समजले नाही. सगळेच घाबरले होते. मार्गदर्शनासाठी बेळगाव येथील काही उत्तरदायी साधकही उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान ओळखून व्यासपिठावर जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांशी संवाद साधायला हवा होता; परंतु ते साधकही पुढे गेले नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत: माईक हातात घेतला आणि मार्गदर्शनाला आरंभ केला. नवीन आलेले सर्व साधक आणि जिज्ञासू यांना थेट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची पर्वणी लाभली.
३. साधकांनी प्रत्येक नियोजन अभ्यासपूर्वक करण्यासाठी शिकावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना चुकांची जाणीव करून देणे
मार्गदर्शन झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना साधकांच्या घरी निवासासाठी मी घेऊन गेलो. श्री. आठलेकर आणि श्री. संजय चव्हाण तेथे पोचले. आयोजनातील ढिसाळपणा आणि सुसूत्रता नसल्याचे पाहून परात्पर गुरु डॉक्टर रागावले होते. त्यांना भोजन घेण्याची इच्छाही झाली नाही. आदरणीय सौ. कुंदाताई आठवले यांच्या आग्रहानंतर परात्पर गुरुदेवांनी भोजन केले.
श्री. आठलेकरकाका एकदम शांत बसले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना विचारले, ‘‘आठलेकर, तुम्हीही तिकडेच थांबलात ना ?’’ त्यावर काय बोलायचे, हे आठलेकरकाकांना सुचले नाही. चूक झाली होती, एवढेच खरे ! या प्रसंगातून मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दुसरे रूप पहायला मिळाले. साधकांना रागावण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता, ‘साधकांनी कोणतेही नियोजन करतांना अभ्यासपूर्वक करणे आवश्यक होते. कार्यक्रमासाठी येणारे पाहुणे बाहेरचे असते, तर काय झाले असते ? सनातन संस्थेची अपकीर्ती झाली असती, याचेही साधकांनी भान ठेवायला हवे.’ त्यांच्या रागावण्यातही साधकांविषयी प्रेम होते. साधकांनी नियोजनात कुठेही अल्प पडू नये, असे त्यांना वाटत होते. यातून ‘शिस्त, सुसूत्रता आणि समन्वय कसा असायला हवा’, हे मला शिकायला मिळाले.
‘परात्पर गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून हा प्रसंग लिहून घेतला. यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२१.२.२०१९)