२४ मे या दिवशी साधिका श्रीमती ताराबाई व्हनमारे यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
सोलापूर येथील सनातनच्या साधिका श्रीमती ताराबाई व्हनमारे (वय ६० वर्षे) यांचे १३.५.२०२१ या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या काही काळ रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्या असतांना आश्रमातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. श्रीमती संध्या बधाले
१ अ. व्यवस्थितपणा : ‘कै. व्हनमारेकाकूंमध्ये व्यवस्थितपणा हा मोठा गुण होता. त्यांना व्यवस्थित रहाण्यास फार आवडत असे.
१ आ. प्रेमळ स्वभाव : मी काकूंपेक्षा लहान असूनही त्या मला ‘ताई’ म्हणायच्या. त्या नेहमी ‘तू माझी मुलगी आहेस’, असे म्हणून माझ्या पाठीवरून हात फिरवायच्या. त्यातून त्यांच्यातील प्रेमभाव आणि वात्सल्य दिसून यायचे. त्या लहानांशी लहान आणि मोठ्यांशी मोठ्या होऊन बोलायच्या.
१ इ. सेवेची तळमळ : सेवा नसेल, तर काकूंना करमत नसे. त्यांच्याकडून सेवा अल्प झाली, तरी त्यांना खंत वाटायची. त्यांना कोणतीही सेवा सांगितली, तरी त्या लगेच ‘हो, करते’, असे म्हणून लगेच सेवेला आरंभ करायच्या. त्या म्हणायच्या, ‘‘आपण गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करतो का ? तरी ते आपली किती काळजी घेतात !’’
१ ई. चुकांविषयी खंत : काकूंना एखादी चूक सांगितली की, त्या लगेच क्षमा मागत आणि ‘मला शिकायला मिळाले’, असे म्हणून योग्य चूक सुधारत.
१ उ. कुलदेवीवर श्रद्धा : त्यांची त्यांच्या कुलदेवीवर पुष्कळ श्रद्धा होती. देवी त्यांच्या स्वप्नात यायची. तेव्हा त्या तिचे छान वर्णन करून सांगायच्या.
१ ऊ. जागेपणी आणि स्वप्नातही परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे : काकूंच्या समोर परात्पर गुरु डॉक्टरांचा विषय काढला, तरी त्यांना पांढर्या वेशातील परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन व्हायचे. ‘त्यांना स्वप्नातही गुरुदेव दिसायचे आणि गुरुदेव त्यांच्याशी बोलायचे’, असे काकू सांगायच्या.
देवाच्या कृपेमुळेच मला कै. व्हनमारेकाकूंचे गुण पहाता आले. याविषयी मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘कै. काकूंची प्रगती करून घ्या’, ही परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करतेे.’ (१४.५.२०२१)
२. सौ. वैशाली मुद्गल
१. ‘व्हनमारेकाकू सतत नामजप करायच्या.
२. श्री विठ्ठलाची भक्ती करायच्या.
२ अ. संतांच्या ओव्या म्हणत सेवा करणे : काकू श्री विठ्ठलाची पुष्कळ भक्ती करायच्या. त्या संत तुकाराम आणि संत जनाबाई यांच्या ओव्या म्हणत सेवा करायच्या. अभंग म्हणून झाल्यावर त्या साधकांना त्याचा अर्थ सांगायच्या.
२ आ. ‘विठ्ठल सेवा करून घेईल’, असा भाव असणे : कधी कधी तातडीच्या सेवा असल्या, तर मी त्यांना म्हणायचे, ‘‘काकू, एवढी सेवा कधी होणार ?’’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘आपण कशाला काळजी करायची ? श्री विठ्ठल येईल आणि ही सेवा करून घेईल !’’ ‘विठ्ठल सेवा करून घेईल’, असा त्यांचा भाव असायचा. त्यांच्यामुळे मलाही सेवा करतांना ताण न येता सेवेचा आनंद मिळत असे.
३. धान्य निवडतांना काकू कधी कधी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणायच्या.
४. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव
४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करणे : त्या सतत परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलायच्या. त्या म्हणायच्या, ‘परम पूज्य डॉक्टर, मी सेवेला जात आहे. मला बसता-उठता येत नाही. तुम्हीच माझ्याकडून सेवा करून घ्या.’ त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा त्या परात्पर गुरु डॉक्टरांना आपले दुःख सांगून (आत्मनिवेदन करून) त्या प्रसंगातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या.
४ आ. ‘आपले दुःख विसरून परात्पर गुरु डॉक्टरांना आनंद द्यावा’, असा विचार करून वागणे : आश्रमात काही कार्यक्रम किंवा सण असला, तर त्या नवीन साडी नेसत आणि दागिने घालत. ‘हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मिळाले आहे, वैकुंठातील प्रत्येक प्रसंगाचा आनंद घेतला, तर परात्पर गुरु डॉक्टरांना आनंद होतो. गुरुदेवांना साधक पुष्कळ प्रिय आहेत. त्यामुळे आपण आपले दुःख विसरून देवाला आवडेल असे वागायचे’, असा त्यांचा भाव असायचा.
४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी जाण्याची ओढ लागणे : काकूंना परात्पर गुरु डॉक्टरांची सतत आठवण यायची. तेव्हा त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येत. त्या नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी ‘माझी प्रगती झाली नाही, तरी चालेल; पण मला शेवटपर्यंत तुमच्या चरणांजवळ ठेवून घ्या’, अशी प्रार्थना करत असत.’ (१३.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |