मिरज – येथील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शासकीय कोरोना रुग्णालयातील ३१ प्राध्यापक डॉक्टरांचे सातारा येथे नव्याने होणार्या वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतर करण्यात आले आहे. तसे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांनी दिले आहेत.
सातारा येथे १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या शैक्षणिक वर्षापासून चालू होणार आहे. त्यासाठी ५१० पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आधुनिक वैद्यांचे सातारा येथील महाविद्यालयात स्थानांतर करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने काढलेल्या या आदेशाच्या विरोधात जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मिरज शासकीय रुग्णालयातील हे सर्व स्थानांतर झालेले आधुनिक वैद्य कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ समजले जातात. अचानक ३१ आधुनिक वैद्य गेल्यामुळे मिरज शासकीय रुग्णालयाचा वैद्यकीय उपचार विभाग किंबहुना कामकाजच ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.