वैशाख शुक्ल पक्ष नवमी (२१ मे २०२१) या दिवशी डॉ. नंदकिशोर वेद यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘डॉ. नंदकिशोर वेद यांनी, म्हणजेच माझ्या वडिलांनी ६.५.२०२१ या दिवशी हा लेख पाठवला होता. त्या काळात त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या ८ सहस्र (सर्वसाधारण न्यूनतम १ लाख ५० सहस्र संख्या आवश्यक) आणि हिमोग्लोबिन जवळजवळ ५ (सर्वसाधारण न्यूनतम १३.५ आवश्यक) पर्यंत होते. एवढ्या बिकट परिस्थितीतसुद्धा त्यांनी हा लेख लिहिला.’ – सौ. क्षिप्रा जुवेकर
अयोध्या येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. नंदकिशोर वेद यांचे ११ मे २०२१ या दिवशी निधन झाले. आज त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत !
१. शिक्षण आणि नोकरी
१ अ. पुष्कळ अभ्यास करून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणे आणि प्राध्यापक म्हणून नोकरी करणे : ‘मी लहानपणी फार कुशाग्र बुद्धीचा नव्हतो; परंतु मी परिश्रम पुष्कळ करत होतो आणि माझी स्मरणशक्ती पुष्कळ चांगली होती. मी जसजसा मोठा होऊ लागलो, तसतसे माझ्या लक्षात येऊ लागले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी ‘करिअर’ करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी परिश्रम आणि अभ्यास पुष्कळ वाढवला. त्यामुळे वर्ष १९७७ मध्ये मी ‘सैन्य विज्ञान’ या विषयात पदव्युत्तर परीक्षेत गोरखपूर विश्वविद्यालयात प्रथम श्रेणीत तिसरा क्रमांक मिळाला. त्यामुळे मी ज्या महाविद्यालयातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले होते, तेथेच जानेवारी १९७८ मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झालो.
१ आ. अध्यापनाच्या सेवेसह संशोधन कार्य करून ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळवणे आणि त्यानंतर पुष्कळ मान-सन्मान मिळणे : माझे गुरु आणि गोरखपूर विश्वविद्यालयाचे तत्कालीन विभागाध्यक्ष माझे परिश्रम पाहून एवढे प्रभावित झाले होते की, वर्ष १९७८ मध्येच त्यांनी मला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवाद (International Terrorism)’ या विषयावर संशोधन करण्यास सांगितले. मीसुद्धा पुन्हा एकदा जीव तोडून कष्ट घेतले. अध्यापनाच्या सेवेसह माझे संशोधनाचे प्रयत्नही चालू होते. वर्ष १९८६ मध्ये माझे संशोधन कार्य पूर्ण झाले आणि मला वर्ष १९८७ मध्ये ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळाली. माझा शोधनिबंध देहलीच्या एका प्रसिद्ध प्रकाशकाने प्रकाशित केला. संशोधनाच्या अंतर्गत मला विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या वतीने तीन मासांसाठी ‘सोवियत संघ अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ मास्कोला पाठवण्यात आले. तेथून परतल्यावर मला फैजाबादमध्ये पुष्कळ सन्मान मिळाला. मी ‘रोटरी क्लब’शी जोडला गेलो आणि तेथे अध्यक्षपदावरही होतो; परंतु तेथील राजकारणामुळे मी ते सोडून दिले.
२. कुलदेवतेची आराधना आणि आलेली अनुभूती
२ अ. कुटुंब धार्मिक असणे, कुलदेवतेची पूजा नियमित होणे आणि त्यात उत्साहाने सहभागी होणे : नंतर मी अयोध्येतील सरयू विहार परिसरात सध्याचे असलेले निवासस्थान खरेदी केले आणि नोव्हेंबर १९९९ पासून तेथे रहात आहे. या पूर्वी मी एकत्र कुटुंबपद्धतीत वडिलोपार्जित घरात रहात होतो. माझे कुटुंब धार्मिक होते आणि आमच्या घरी वर्षातून २ – ३ वेळा कुलदेवतेची विधीवत आणि पुष्कळ भावपूर्ण पूजा केली जात असे. कुलदेवतेवर माझी श्रद्धा पुष्कळ होती. बालपणापासूनच मी पुष्कळ उत्साहाने आणि मनापासून पूजेमध्ये सहभागी होत असे.
२ आ. कुलदेवतेच्या संदर्भात आलेली अनुभूती – पुष्कळ प्रयत्न करूनही दुचाकी चालू न होणे, पत्नीला कानात ‘कुलदेवतेचे दर्शन घेतले का ?’, असा आवाज ऐकू येणे, त्यानंतर घरी जाऊन कुलदेवतेची क्षमायाचना करणे आणि नंतर दुचाकी पहिल्याच प्रयत्नात चालू होणे : १२.११.१९९९ या दिवशी ‘सरयू विहार’च्या घरात गृहप्रवेशाची पूजा आयोजित केली होती. नेहमीप्रमाणे पूजा करून सरयू विहारला जाण्यासाठी मी आणि माझी पत्नी खाली आलो. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतरही माझी दुचाकी चालू झाली नाही. ‘उशीर होत आहे’, हे पाहून माझ्या मोठ्या भावाने त्याची स्वतःची दुचाकी चालू करून दिली. थोडे दूर जाऊन एका मंदिरासमोर ती दुचाकीसुद्धा बंद पडली आणि पुष्कळ प्रयत्न केल्यावरही चालू झाली नाही. माझ्या पत्नीचे लक्ष मंदिराकडे होते आणि ती प्रार्थना करत होती. त्याच वेळी जणूकाही कुणीतरी तिच्या कानात म्हणत होते, ‘देवतन बाबा (आमचे कुलदैवत)’चे दर्शन घेतले का ?’ तेव्हा तिला आमच्या चुकीची जाणीव झाली. आम्ही दुचाकी ढकलत घरी गेलो आणि कुणाशीही काही न बोलता सरळ कुलदेवतेच्या स्थानी पोचलो आणि त्यांची क्षमायाचना करून प्रार्थना केली. त्यानंतर खाली आल्यावर माझी दुचाकी पहिल्याच प्रयत्नात चालू झाली आणि आम्ही सरयू विहारला पोचलो. त्यानंतर आम्ही गृहप्रवेशाची पूजा पूर्ण केली. अशा प्रकारे कुलदेवतेने आम्हाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करवून दिली.
३. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ
३ अ. पत्नीने घराजवळील सनातनच्या सत्संगात जाणे आणि येतांना कुलदेवता अन् दत्त यांच्या नामपट्ट्या आणणे आणि कुलदेवतेची पट्टी पाहून ‘या संस्थेशी आपला गाढ संबंध आहे’, असे वाटणे : सरयू विहारला रहायला आल्यानंतर जवळजवळ दीड वर्षानंतर सनातन संस्थेचे काही साधक आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘जवळच्या मंदिरात सत्संग आहे, तेथे या.’’ माझी पत्नी सत्संगाला गेली आणि जेव्हा परत आली, तेव्हा तिच्या हातात ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या दोन पिवळ्या नामपट्ट्या होत्या. सरयू विहारच्या गृहप्रवेशाच्या दिवशी आलेली कुलदेवतेची अनुभूती आठवून आणि कुलदेवतेची पट्टी पाहून मला आतून वाटू लागले, ‘या संस्थेशी आपला गाढ संबंध आहे.’
३ आ. आरंभी सत्संग घेणे टाळणे आणि सत्संग घेण्यास आरंभ केल्यावर ते रूक्ष वाटणे : नंतर फैजाबाद येथील पूर्णवेळ साधक डॉ. उदय धुरी यांनी मलासुद्धा सत्संग घ्यायला सांगितले; परंतु ‘मी ग्रंथ विकत घेतले आहेत, ते आधी वाचतो आणि मग घेतो’, असे सांगून मी त्यांना टाळले. जेव्हा मी सत्संग घ्यायला प्रारंभ केला, तेव्हा ते पुष्कळ तात्त्विक, रूक्ष असायचे आणि मी त्यात माझे स्वतःचेही जोडत असे.
३ इ. प्रसारासाठी गेल्यावर स्वतःतील अहंची जाणीव होणे आणि त्यानंतर सेवा केल्यावर चांगले वाटू लागणे : नंतर वर्ष २००३ मध्ये मसूरकर दांपत्य फैजाबाद येथे आले. त्याच वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त मी मसूरकरकाकांसह पहिल्यांदा प्रसारासाठी गेलो. आम्ही एका खासगी आस्थापनाच्या कार्यालयात गेलो. ते काकांना साहाय्य करत होते. त्यांचे कार्यालय एकदम आधुनिक आणि काचेचे होते. त्यांनी आम्हाला तेथे बसायला सांगितले. त्यांनी म्हटले होते, ‘‘आता थोड्या वेळाने तुम्हाला बोलावतो’’; परंतु दोन घंटे त्यांनी आम्हाला बोलावलेच नाही. त्यांच्या कार्यालयात अनेक व्यक्ती ये-जा करत होत्या; परंतु त्यांनी आम्हाला बोलावले नाही. काका त्यांच्या कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाची संहितेची प्रत काढू लागले. मी एकटाच बसून अपमानाचा घोट गिळत होतो. तेव्हा मला जाणीव झाली, ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’ माझ्या मनात पुष्कळ वेळा आले, ‘काकांना सोडून निघून जावे’; परंतु तसे करायला माझे मन धजत नव्हते. त्याचबरोबर मला वाटू लागले, ‘ईश्वर या सेवेच्या माध्यमातून मला माझ्यातील अहंची जाणीव करवून देण्यासाठी आणि तो न्यून करण्यासाठीच त्यांना घेऊन आला आहे.’ नंतर ‘माझा अपमान झाला आहे’, ही भावनासुद्धा माझ्या मनातून निघून गेली आणि मी काकांच्या समवेत गुरुपौणिर्र्मेच्या सेवेसाठी वारंवार जाऊ लागलो अन् मला चांगले वाटू लागले.
४. अयोध्या येथील प्रसारकार्याचा आरंभ
४ अ. संस्थेचे कार्य घरातूनच चालू झाल्याने सर्व कुटुंबियांची साधना करण्याची आवड वाढू लागणे : वर्ष २००३ मध्येच फैजाबाद येथील प्रसारकार्य काही कारणास्तव बंद करण्यात आले आणि तेथील सर्व पूर्णवेळ साधक निघून गेले. त्यानतर सरयू विहारमधूनच संस्थेचे कार्य चालू लागले. त्यामुळे माझी, तसेच माझी पत्नी सौ. मिथिलेश कुमारी आणि दोन्ही मुली कनुप्रिया अन् क्षिप्रा यांची सेवा आणि साधना करण्याची आवड वाढू लागली.
४ आ. प्रसारकार्य वाढत जाऊन गुरुकृपेने घरातच अनेक साधकांसाठी शिबिर आणि अभ्यासवर्ग यांचे नियोजन होणे : प्रसारकार्य वाढू लागले. काही जुन्या साधिकासुद्धा क्रियाशील झाल्या. प्रसारातील साधकांचे नियमित दौरे होऊ लागले. साधक सरयू विहारमध्येच थांबू लागले. नंतर परात्पर गुरुदेवांच्या कृपेने पहिल्या आणि दुसर्या माळ्यावर एका खोलीची सोय झाली. पहिल्या माळ्यावर एक मोठी खोली बांधली. तिच्यामध्ये ५० लोक बसू शकत होते. प्रत्येक २ – ३ मासांनी येथे जवळपासच्या ३० – ३५ साधकांसाठी २ – ३ दिवसांचे शिबिर आणि अभ्यासवर्ग होऊ लागले. जरी त्या वेळी माझे वेतन अधिक नव्हते, तरीही ‘बांधकाम आणि शिबिर इत्यादी कसे होत होते ?’, हे मला समजतच नव्हते.
४ इ. प.पू. दास महाराज यांच्या प्रथमदर्शनाने ‘संत किती कृपाळू असतात ?’, याची जाणीव होणे : आता ‘सरयू विहार घर आहे’, असे वाटतच नव्हते. ‘तो आश्रमच आहे’, असे वाटू लागले. वषर्र् २००३ मध्ये प.पू. दास महाराज यांचे शुभागमन फैजाबाद येथे झाले. माझा जन्म अयोध्येत झाला होता; परंतु तेथील स्थितीमुळे संतांप्रती माझ्या मनात मुळीच आदरभाव नव्हता. परात्पर गुरुदेवांनी माझ्या मनातील हा विकार नष्ट करण्यासाठीच जणू प.पू. दास महाराज यांना येथे पाठवले. वास्तविक ‘संत कसे असतात ? किती सरळ आणि कृपाळू असतात ?’, याची जाणीव त्यांच्या प्रथम दर्शनानेच झाली.
४ ई. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांचा आशीर्वाद लाभल्यामुळे क्षिप्राच्या मनातील साधनेविषयीच्या अडचणी दूर होणे : त्यांचे सरयू विहार येथेही शुभागमन झाले. क्षिप्राच्या आईने त्यांच्यासाठी विविध प्रकारची भजी केली होती. क्षिप्राने त्यांच्यासाठी तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन तांब्याच्या ताम्हणात त्यांचे हात धुतले. नंतर आत जाऊन ते तीर्थ स्वतः प्राशन केले. अशा प्रकारे प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांचा आशीर्वाद लाभल्यामुळे क्षिप्राच्या मनातील साधनेविषयी अडचणी दूर झाल्या आणि तीसुद्धा साधनेत पूर्णपणे समर्पित झाली. जरी ती बी.एस्.सी. शिकत होती, तरीही तिचा बराच वेळ ‘प्रसारातील सेवा आणि वाराणसी सेवाकेंद्रात जाणे’, यांमध्ये जात असे.
नंतर अयोध्या आश्रमात श्री गणेशमूर्तीचे शुभागमन झाले. पहिल्या माळ्यावर सभागृहात तिचे स्थान निश्चित झाले. मूर्तीची पूर्णतः काळजी घेऊन सुविधेनुसार जिज्ञासू तिला प्रदक्षिणा घालू शकतील, त्यासाठी असणारी प्रदक्षिणा मार्गाची चिन्हे अजूनही दिसत आहेत.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे झालेले दर्शन
वर्ष २००३ मध्ये मी आणि माझे ३ सहकारी पुणे विश्वविद्यालयात एका परिषदेला (conference ला) जात होतो. त्या वेळी साधकांनी सांगितल्यावर मी ‘राष्ट्रीय संरक्षण’ या विषयाला अध्यात्माशी जोडले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले मिरजमध्ये होते. तेथे जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचे नियोजन केले. २१.१०.२००३ या दिवशी आम्हाला त्यांच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त झाले. नंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या त्या संशोधनपत्राचे मराठीत भाषांतर करून ते मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशितसुद्धा केले.
६. याच काळात मुलगी कनुप्रियासुद्धा साधना आणि सेवा यांत सक्रीय झाली. शिक्षण घेतांनाच सत्संग घेणे, वितरणकक्ष (स्टॉल) लावणे इत्यादी सेवा ती करू लागली.
६ अ. अयोध्या येथील साधक क्रियाशील होऊन तेथे गुरुपौर्णिमेचे आयोजन होऊ लागणे आणि नंतर गुरुपौर्णिमेला उपस्थिती अल्प राहू लागल्याने गुरुपौर्णिमेचे आयोजन बंद होणे : अयोध्या येथील बरेच साधक क्रियाशील झाले. अयोध्येत प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत असे. प्रारंभी आम्हाला सभागृह निःशुल्क मिळत होते आणि उपस्थितीही चांगली असायची; परंतु हळूहळू निःशुल्क सभागृह मिळणे बंद झाले अन् उपस्थितीही पुष्कळच अल्प राहू लागली. त्यामुळे तेथील गुरुपौर्णिमेचे आयोजन बंद झाले.
७. परात्पर गुरुदेवांनी रक्षण केल्याची आलेली प्रचीती !
७ अ. पाऊस चालू असतांना दुचाकीचा अपघात होऊनही कोणती गंभीर दुखापत न होणे : वर्ष २००७ मध्ये मी आमच्या जुन्या वडिलोपार्जित घरात काही बांधकाम करवून घेत होतो. सायंकाळी जोरात पाऊस आला. घरासमोर पुष्कळ पाणी साचले आणि तेथे उभी केलेली माझी दुचाकी अर्धी पाण्यात बुडली. मला वाटले की, आता ती चालू होणार नाही; परंतु पाणी निघून गेल्यावर ती एका किकमध्येच चालू झाली. मी सरयू विहारकडे निघालो. काही अंतर गेल्यावर माझ्या लक्षात आले की, स्कूटरचा ‘हॉर्न’ वाजत नाही आणि ‘ब्रेक’सुद्धा लागत नाही. समोरून जाणार्या सायकलस्वारापासून वाचण्यासाठी मी पुढचा ‘ब्रेक’ लावला. त्यामुळे दुचाकी घसरली आणि दुचाकीसह मी रस्त्यावर पडलो. ईश्वराच्या कृपेने मला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.
७ आ. दुचाकीवरून जातांना एका झाडाची फांदी डोक्यावरून जाऊन खाली पडल्याचे जाणवणे आणि शिरस्त्राणामुळे रक्षण होऊन आश्रमापर्यंत पोचणे : गर्दीच्या रस्त्याने जाण्यापेक्षा मी रहदारी नसलेला; परंतु लांबचा रस्ता निवडला. अंधार दाटून आला होता; परंतु ईश्वराच्या कृपेने दुचाकीचा दिवा चालू होता. हळूहळू जात मी जिल्हा कारागृह आणि पोलीस लाइनच्या मधून जाणार्या रस्त्यावर पोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विदेशी वृक्ष लावले होते. ते मध्यम आकाराचे होते. अकस्मात् विजेच्या वायरमध्ये मोठा आवाज झाला आणि त्या वेळी मोठा प्रकाश पडला अन् नंतर अंधार झाला. मला असे वाटले की, कुठेतरी झाड पडले आहे. त्यातील एक फांदी माझ्या मस्तकाला लागली आणि पाठीवरून घसरत पडली. ईश्वराच्या कृपेने मी शिरस्त्राण घातले होते आणि दुचाकी वेडीवाकडी होऊन संतुलित झाली. मी पडलो नाही आणि तसाच हळूहळू सुरक्षितपणे आश्रमात पोचलो. मला वाटत होते की, रस्त्याच्या बाजूला असलेले मध्यम आकाराचे झाड पडले आहे; म्हणून मला काही विशेष भीती वाटली नाही.
७ इ. दुसर्या दिवशी त्याच मार्गाने गेल्यावर कडूनिंबाचा विशालकाय वृक्ष पडल्याचे लक्षात येणे आणि परात्पर गुरुदेवांनीच त्या अपघातापासून रक्षण केल्याचे जाणवणे : माझी मोठी कन्या कनुप्रिया त्या वेळी अलाहाबादमध्ये (आताच्या प्रयागराजमध्ये) शिकत होती आणि दुसर्या दिवशी सकाळी तिला अलाहाबादला जायचे होते. मी तिला स्कूटीने बसस्थानकावर सोडण्यासाठी त्याच मार्गाने गेलो. तेथे आदल्या दिवशी सायंकाळी झाड पडले होते. तेथे गेल्यावर लक्षात आले की, रस्त्यावर पडलेले झाड, म्हणजे कडूनिंबाचा विशालकाय वृक्ष होता. तो कारागृहाच्या सीमेमध्ये होता आणि तो पडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अनेक मध्यम आकाराची झाडेही उन्मळून पडली होती. तेव्हा लक्षात आले की, त्या वेळी साक्षात् परात्पर गुरुदेवांनीच माझ्या प्राणांचे रक्षण केले आहे; कारण कडूनिंबाचा तो वृक्ष एवढा विशाल होता की, तो पडतांना मी त्याच्या खाली उभा असतो, तर जिवंत रहाणे कठीणच होते.
अशा प्रकारे श्री गुरूंनी प्रत्येक क्षणी आमचे रक्षण केले. अनेक प्रसंग तर येऊन गेलेही असतील, आम्हाला त्या संकटांची जाणीवही झाली नसेल.’
– डॉ. नंदकिशोर वेद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.५.२०२१)
डॉ. नंदकिशोर वेद यांनी त्यांची कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांच्या आध्यात्मिक जीवनाचे दिलेले टप्पे आणि गुरूंप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
२१.७.२०२० या दिवशी डॉ. नंदकिशोर वेद यांची कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या अनुषंगाने डॉ. नंदकिशोर वेद यांनी केलेले लिखाण पुढे दिले आहे.
१. क्षिप्राच्या आध्यात्मिक जीवनाचे टप्पे
१ अ. वर्ष २००० – क्षिप्राच्या साधनेला गुरुकृपेने झालेला आरंभ ! : ‘वर्ष २००० मध्ये सरयू विहार, अयोध्या येथे सनातन संस्थेचे साधक सत्संग घेण्यासाठी आले असता क्षिप्राने तिच्या खोलीचे दार आतून बंद करून घेतले. नंतर गुरुकृपेने ‘ते बंद दार कधी उघडले, क्षिप्रा सत्संग कधी घेऊ लागली आणि अयोध्येतील सनातनच्या कार्याचे दायित्वही घेऊ लागली’, ते कळलेच नाही.
१ आ. वर्ष २००५ – क्षिप्राचा पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय ! : वर्ष २००५ मध्ये सरयू विहार, अयोध्या येथे क्षिप्रा मला म्हणाली, ‘‘पिताजी, मी सनातन संस्थेत पूर्णवेळ सेवा करणार आहे.’’ माझी क्षिप्राएवढी दृढ श्रद्धा नसल्याने मी तिला ‘एम्.एस्.सी. (मास्टर ऑफ सायन्स)’ पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ साधनेसाठी जाण्यास सांगितले आणि तिने ते मान्य केले.
१ इ. डिसेंबर २००७ – पूर्णवेळ साधनेला आरंभ करणारी क्षिप्रा बनली कुटुंबियांची ‘आध्यात्मिक माता’ ! : गुरुकृपेने क्षिप्रा पूर्णवेळ साधिका झाली. आपले साहस, दृढता, निडरता, परात्पर गुरु डॉक्टरांवरील अतूट श्रद्धा आणि त्यांच्या कृृपेचे बळ यांवर तिने तिच्या जीवनातील अत्यंत कठीण काळ पार केला. ती आमची ‘आध्यात्मिक माता’ आहे. आम्ही साधनेत जेथे गोंधळतो, अडकून पडतो, तेथे ती आम्हाला सांभाळते अन् मार्गदर्शन करते.
१ ई. ऑनलाईन भावसत्संग घेण्याची सेवा देऊन प.पू. गुरुदेवांनी केलेला क्षिप्राचा उद्धार (२१ जुलै २०२० या दिवशी क्षिप्राची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होणे) : या आपत्काळाला संपत्काल बनवणारे, सर्वांना भाव-भक्तीने अभिसिंचित करणारे भावसत्संग आम्हाला प्रदान करून गुरुदेवांनी सर्व भक्तांचे कल्याण तर केलेच आहे. क्षिप्राचा तर त्यांनी उद्धारच केला आहे.
‘आम्हा सर्वांवर गुरुदेवांची छत्रछाया रहावी’, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना आहे. कृतज्ञता गुरुदेव, आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– डॉ. नंदकिशोर वेद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवालासाहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेककथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचाप्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांतसांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहूनअधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहूनअल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिकस्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. हीपंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदनाजाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजेत्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |