रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. कामोठे

१ अ. सूक्ष्मातून यज्ञकुंडातून श्री दुर्गादेवी प्रकट झाली असून ती पृथ्वीवरील साधकांचे रक्षण करत असल्याचे दिसणे आणि देवीसह सूक्ष्मातून संभाषण होणेे : ‘नामजपाला आरंभ केल्यावर मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘यज्ञकुंडातून श्री दुर्गादेवी प्रकट झाली असून ती पुष्कळ रागात आणि सूक्ष्मयुद्धाच्या सिद्धतेत आहे. साक्षात् श्री दुर्गादेवी संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत आहे. तिच्या हातात त्रिशूळ, तलवार आणि पाश अशी आयुधे आहेत. श्री दुर्गादेवी प्रत्येक साधकाच्या पाठीशी उभी राहून सूक्ष्मातून विषाणूंशी लढत आहे. कधी त्रिशूळ, तर कधी तलवार यांनी त्या विषाणूंचा नाश करत आहे. भारतातच नाही, तर विदेशातील साधकांच्या रक्षणासाठीही देवी गेली आहे.’ त्या वेळी माझा भाव जागृत होऊन मी देवीला विचारले, ‘तू आमच्या रक्षणासाठी किती करतेस ?’ त्यावर दुर्गादेवी म्हणाली, ‘हिंदु राष्ट्रात साधकच रहाणार आहेत.’ मग मी कुतूहलाने देवीला विचारले, ‘खरेच आम्ही हिंदु राष्ट्राची पहाट पाहू शकणार का ?’ तेव्हा श्री दुर्गादेवी म्हणाली, ‘हो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच तुम्ही हिंदु राष्ट्राची पहाट पहाणार आहात.’

१ आ. नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधे श्री दुर्गादेवी, त्रिमुखी दत्त आणि शिव यांचे दर्शन होणे : त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मी कृतज्ञताभावाने श्री गुरूंच्या चरणांजवळ गेले. मी गुरुदेवांना म्हणाले, ‘तुम्ही आम्हा साधकांची दुर्गादेवी आहात. तुम्हीच दत्त आणि तुम्हीच आमचे शिव आहात.’ त्या वेळी जप करतांना प.पू. गुरुदेवांमध्ये लाल साडी धारण केलेली दुर्गादेवी दिसली. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना गुरुदेवांमध्ये त्रिमुखी दत्ताचे दर्शन झाले आणि शिवाचा नामजप करतांना माथ्यावर चंद्र धारण केलेल्या शिवाचे दर्शन झाले. हे सर्व अनुभवतांना माझ्या डोळ्यांतून पूर्णवेळ भावाश्रू येत होते.

१ इ. नामजप पुष्कळ भावपूर्ण होणे : ‘साधकांना पूर्वजांमुळेही आध्यात्मिक त्रास होत आहेत. ते त्रास दूर करण्यासाठी दत्तगुरु सिद्ध झाले आहेत, तसेच भगवान शिव शिवलोकातून डमरू वाजवून डमरूच्या नादामुळे विषाणू नष्ट करत आहे’, असे जाणवले. ४५ मिनिटे हा नामजप पुष्कळ भावपूर्ण झाला.

१ ई. नंतर घरामध्ये पुष्कळ मोठ्या आवाजात दूरचित्रवाहिनीवर रज-तम प्रधान गाणी लागली होती. त्यामुळे माझा नामजप नीट झाला नाही. तेव्हा माझा नामजप होऊ नये; म्हणून स्थुलातून आक्रमण झाल्यासारखे वाटले. देवाने त्यावरही मात करायला शिकवले. देवाने ‘हेडफोन’ लावून जप ऐकू शकतो’, असे सुचवले. त्यामुळे मला पुन्हा नामजप करता आला.

‘हे गुरुमाऊली, नामजप करवून घेणारेही तुम्हीच आणि अनुभूती देणारेही तुम्हीच आहात. माझ्याकडून ही अनुभूती लिहून घेणारेही तुम्हीच आहात. आम्हा सर्व साधकांचे सर्वस्व तुम्हीच आहात. गुरुदेव, ‘तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न करण्यात आम्ही अल्प पडतो’, त्यासाठी क्षमा करा. ‘अखंड आमच्या हृदयात राहून तुम्हीच आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. पल्लवी म्हात्रे

२. नवीन पनवेल

२ अ. उत्साह जाणवणे : ‘सकाळी उठल्यावर पुष्कळ प्रसन्न वाटून कोणताही ताण वाटत नव्हता आणि पुष्कळ उत्साह वाटत होता. आधीची सगळी मरगळ निघून गेली. परात्पर गुरुदेवांचा पुष्कळ आधार वाटला आणि ‘हे जग केवळ आणि केवळ परात्पर गुरुदेवच सावरतील’, असा विचार माझ्या मनात आला.’ – सौ. स्वाती महाकाळ

२ आ. ‘श्री दुर्गादेवी स्थुलातून आणि दत्त अन् शिव सूक्ष्मातून युद्ध करत आहेत’, असे जाणवणे : ‘नामजप करत असतांना ‘आम्ही रामनाथीला आहोत आणि नामजप चालू असतांना ‘श्री दुर्गादेवीचे मारक रूप दिसून ती सूक्ष्म युद्ध करत आहे. दत्त स्थिर असून शिव पूर्णतः ध्यानस्थ अवस्थेत आहे’, असे दिसले. ‘हे तिन्ही देव अनिष्ट शक्तींचा सामना करत आहेत. श्री दुर्गादेवी स्थुलातून आणि दत्त अन् शिव सूक्ष्मातून युद्ध करत आहेत’, असे जाणवत होते. या तिन्ही देवांचे सूक्ष्म युद्ध ईश्‍वराच्या कृपेमुळे पहाता आले.’ – श्री. सूर्यकांत परब

२ इ. संत आणि सद्गुरु यांचे तोंडवळे दिसून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : नामजप करतांना परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, परात्पर गुरु पांडे महाराज, प.पू. भक्तराज महाराज या सर्वांचेे तोंडवळे समोर दिसले. ‘आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी हे सर्व किती आणि काय करतात ?’, याची जाणीव झाली अन् पुष्कळ कृतज्ञता वाटली. नामजप करत असतांना पुष्कळ वेळा जांभया येऊन नंतर पुष्कळ हलके वाटत होते.’ – सौ. जयवंती सावंत

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक