कोल्हापूर – मागणी नसल्याने साखरेची विक्री कुठे करायाची ? असा प्रश्न साखर कारखानदारांसमोर आहे. यावर पर्याय म्हणून ‘बी हेवी मोलॅसीस’मध्ये २० टक्के साखर मिश्रण करावी, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कारखानदारांना दिला. त्यापासून तयार होणार्या इथेनॉलला उसाच्या रसापासून तयार होणार्या इथेनॉलचा दर देण्यासाठी प्रयत्न करू. याविषयीचा प्रस्ताव राज्यातील कारखान्यांनी केंद्राकडे पाठवावा. त्याचा पाठपुरावा करू, अशी सूचना गडकरी यांनी केली.
केंद्राने याला मान्यता दिल्यास साखर साठा कमी करण्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचे मत साखरतज्ञांचे आहे. साखर मिश्रणाचा प्रयोग झाल्यास देशातील आणि राज्यातील साखरेचा साठा न्यून होऊ शकेल. सध्या साखर कारखादारी आर्थिक संकटात आहे. देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १०६ लाख टनाचा आहे. यापैकी कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यांचा वाटा अधिक आहे. माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून या मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठवा, अशी सूचना श्री. गडकरी यांनी राज्यातील साखर उद्योगाला केल्या आहेत.