एका शहरातील एका साधिकेच्या मामेभावाला कोरोना झाल्यावर रुग्णालयात भरती केल्यावर आलेला कटू अनुभव
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने माझ्या मामेभावाला १० एप्रिल २०२१ या रात्री एका शहराच्या उपनगरातील एका खासगी रुग्णालयामधून अन्य रुग्णालयात भरती केले. तेथे त्याला साध्या ‘एस्.ओ.२’वर ठेवले होते अन् त्याची तब्येत खालावू लागली होती. रुग्णालयात भरती करतांना त्याची ‘एस्.ओ.२’ची पातळी व्हेंटिलेटरवर ८८/८९ किंवा त्याखाली होती. त्याला व्हेंटिलेटर असलेली खाट मिळावी, यासाठी खूप प्रयत्न केले; पण त्या घडीला कोणत्याही दवाखान्यात ती उपलब्ध होत नव्हती.
रुग्णाच्या स्थितीविषयी रुग्णालयाकडून कोणतीही माहिती सांगितली न जाणे आणि आधुनिक वैद्यांनी रुग्णाविषयी नकारात्मक बोलणे
मामेभावाची तब्येत १३ एप्रिलला अचानक पुष्कळ खालावली. त्याची ‘एस्.ओ.२’ची पातळी एकदम ५३ वर आली. त्यामुळे दवाखान्यात रुग्णासमवेत असलेले माझे अन्य मामेभाऊ आणि सख्खा भाऊ यांनी मला संपर्क करून रुग्णालयात बोलावून घेतले. तेथे गेल्यावर रुग्णाची स्थिती जाणून घेत असतांना तेथील आधुनिक वैद्य काय उपचार करत आहेत ? आणि त्याला रुग्ण कसा प्रतिसाद देत आहे ? याविषयी सांगितले जात नव्हते. तेथील आधुनिक वैद्य रुग्णाविषयी पुष्कळ नकारात्मक बोलत होते. त्यामुळे माझ्या भावांनी सांगितले की, आधुनिक वैद्यांच्या बोलण्याने आम्ही पुष्कळ खचत चाललो आहोत, तू आमच्या सवमेत ये. आपण त्यांना संपर्क करूया.
आधुनिक वैद्यांना रुग्णाचे नाव ठाऊक नसतांनाही नातेवाइकांना माहिती देणे, तसेच त्यांनी नातेवाइकांशी नकारात्मक बोलून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे
त्यामुळे मी तेथेच थांबून ‘आधुनिक वैद्यांना संपर्क करायचा’, असे मनाशी ठरवले आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाला. आमच्या संभाषणाचा प्रारंभच त्यांनी ‘तुमच्या रुग्णाची स्थिती खूप गंभीर (क्रिटीकल) आहे’, असा केला. त्यानंतर त्यांनी ‘तुमच्या रुग्णाचे नाव काय ?’, असे विचारले. त्या वेळी त्या आधुनिक वैद्यांनी ‘रुग्णाची जी स्थिती मला सांगितली ती कशाच्या आधारावर ?’, असा प्रश्न मला पडला. नंतर ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या रुग्णासाठी सर्व प्रयत्न करत आहोत; पण तुम्हाला सर्व माहिती हवी आहे; म्हणून सांगत आहोत. तुम्हाला अतीदक्षता विभागाचा (‘आयसीयू’चा) मृत्यूदर (डेथ रेट) काय आहे ठाऊक आहे का ? पूर्वी दोन मासांत जेवढे रुग्ण मरण पावत होते, तेवढे आता दोन दिवसांत मरण पावत आहेत.’’ हे ऐकल्यावर माझा भाऊ आणखीनच घाबरला.
यानंतर माझे आणि आधुनिक वैद्य यांचे पुढील संभाषण झाले.
मी : मी एक स्टाफ परिचारिका आहे. माझे शिक्षण जी.एन्.एम्. (जनरल नर्सिंग मिडवायफरी) पर्यंत झाले आहे. काही मास चाकरी केली आणि विवाहानंतर मला चाकरी सोडावी लागली. तुम्ही असा डेथ रेट रुग्णाच्या नातेवाइकांना कसा काय सांगता ?
आधुनिक वैद्य : तुम्हाला तर सर्व ठाऊक असेलच ना ?
मी : त्याच्या (मामेभावाच्या) तब्येतीत काही सुधारणा असेल ना ? किंवा सुधारणा होण्याची काही आशा असेल ना ?
आधुनिक वैद्य : माझ्याकडे एवढी सर्व माहिती नाही.
मी : आपण त्याला दोन प्लाझ्मा दिले आहेत. त्यामुळेही त्याच्या आरोग्यात काही पालट होत नाही का ?
आधुनिक वैद्य : तुम्हाला माहिती असेलच की, दुसर्याचा प्लाझ्मा दिल्यावर शरिराला प्रतिसाद द्यायला कालावधी लागतो.
मी : सर तो पुष्कळ घाबरला आहे आणि त्याला सकारात्मक करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे. तुम्ही असे केले, तर त्याला साहाय्य होईल. अन्यथा आम्हाला अनुमती द्या, आम्ही प्रयत्न करतो.
आधुनिक वैद्य : स्वागतकक्षावर (‘रिसेप्शन’वर) विचारून तुम्हीच निर्णय घ्या.
(हे सर्व ऐकल्यावर सकारात्मकतेची अधिक आवश्यकता कुणाला आहे ? आधुनिक वैद्यच जर रुग्णाच्या नातेवाइकांशी असे वागत असतील, तर प्रत्यक्ष रुग्णांना आजारातून बाहेर पडण्यासाठी कसे उभारी देत असतील ? असे विचार मनात आले.)
त्यानंतर रुग्णाची स्थिती प्रतिदिन सकाळी खालावलेली असायची आणि सायंकाळी त्यामध्ये थोडी सुधारणा व्हायची. यानंतर त्याच रुग्णालयातील अन्य एका आधुनिक वैद्यांशी संभाषण झाले. ते थोडे सकारात्मक वाटले.
अचानक मामेभावाची तब्येत खालावून त्याचे निधन होणे
१६ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा माझ्या भावाने ‘मामेभावाची तब्येत ठिक आहे. त्याची ‘एस्.ओ.२’ची पातळी ८३ आहे’, असे सांगितले. त्याच दिवशी दुपारी १ वाजता त्याने पुन्हा मला भ्रमणभाष करून ‘मामेभावाचे हृदय बंद पडले आहे. आधुनिक वैद्य त्याला पंपिंग करत आहेत. तोंडात पाईप घातला आहे. तू तातडीने येते का ? मला काहीच सुचत नाही. मामेभाऊ पूर्ण खचला आहे. आधुनिक वैद्य म्हणत आहेत की, रुग्णाचे हृदय बंद पडले, तर आम्ही काही करू शकणार नाही’, असे सांगितले.
त्यानंतर मी रुग्णालयात दुपारी १.४५ वाजता पोचले. त्या वेळी तेथील परिचारिकेला रुग्णाच्या तब्येतीच्या विषयी विचारले. तेव्हा ‘तो खूप गंभीर आहे. ‘एस्.ओ.२’ची पातळी पुष्कळ अल्प आहे. तुम्हाला नंतर कळवतो’, असे सांगितले. प्रतिदिन त्याला रुग्णालयात भेटण्यासाठी गेल्यावर त्याची खाट आणि ‘व्हेंटिलेटर रिडींग’ दरवाजातून दिसत असे; पण त्या दिवशी त्याच्या खाटेच्या चारही बाजूंनी पडदा लावलेला होता. मॉनिटरचे रिडींगही दिसत नव्हते. नंतर परिचारिकेने ‘तुम्ही खाली थांबा. आधुनिक वैद्य तुम्हाला नंतर सर्व सांगतील’, असे सांगितले.
अतीदक्षता विभागात ईसीजी मशीन उपलब्ध नसणे
दुपारी २.२० वाजता आम्हाला वर बोलावले. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी आम्हाला ‘थोडे थांबा. एकदा ईसीजी काढून तुम्हाला सांगतो’, असे सांगितले. आम्ही १५ मिनिटे थांबलो. त्या वेळी लिफ्टमधून ईसीजी मशीन आणले आणि अतीदक्षता विभागामध्ये (‘आयसीयू’मध्ये) नेले. (‘आयसीयू’मध्ये ईसीजी मशीन नाही, हे अयोग्य वाटले. आवश्यक ती सर्व उपकरणे ‘आयसीयू’मध्ये असायला हवीत, असे वाटले.) त्यानंतर काही वेळाने आम्हाला आत बोलावले आणि सांगितले, ‘‘ईसीजी पूर्ण प्लेन आला आहे. आता आम्ही थांबतो. तुमच्यापैकी एक जण मृतदेह पाहू शकता.’’
माझे छोटे मामा मृतदेह पहायला गेले. यानंतर सर्व गोष्टींची पूर्तता पूर्ण होईपर्यंत ५ घंट्यांचा कालावधी गेला. रुग्णवाहिका आम्हाला शोधायला सांगितली.
कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात देतांना रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा !
रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवण्यापूर्वी रुग्णालयाकडून नातेवाइकांना एकदा खात्री करायला सांगितली. खात्री करण्यासाठी त्यांनी पॅकिंग केलेल्या पिशवीची चेन उघडून तोंडवळा दाखवला, तर तो उघडा होता. खरे तर कोरोनाचा रुग्ण दगावल्यावर त्याचा मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकमध्ये बंदिस्त (पॅकबंद) असायला हवा होता; पण तसा नव्हता. मृतदेह खुला राहिल्यास त्या माध्यमातूनही संसर्ग होऊ शकतो, हेही लक्षात घेतले गेले नव्हते, असे लक्षात आले.
– एक साधिका
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव छापण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. या लिखाणाद्वारे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समिती पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |