सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

सतना (मध्यप्रदेश) – येथे पोलिसांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून ४-५ कागदांवर ‘राम’ असे लिहून घेतले जात आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येत आहे. संतोष सिंह या पोलीस उपनिरीक्षकाने या प्रयत्न चालू केला आहे.

पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियम मोडणार्‍या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय चालू केला आहे.

संतोष सिंह म्हणाले की, यापूर्वी आम्ही नियम मोडल्याची शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगत होतो किंवा संबंधितांना घंटाभर बसवून नंतर सोडून देत असू. मला वाटले की, ते नुसते बसण्यापेक्षा त्याऐवजी भगवान श्रीरामाचे नाव लिहू शकतात. त्यामुळे आम्ही ही शिक्षा चालू केली. त्यानंतर बाहेर फिरणार्‍यांना आम्ही घरात बसून पालकांची काळजी घेण्याची चेतावणी देतो. आतापर्यंत कुणावरही या शिक्षेसाठी बळजोरी केली नाही. हा उपाय कुणाच्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. लोक त्यांच्या इच्छेने लिहितात. गेले ३ दिवस आम्ही हा उपाय राबवत आहोत. आतापर्यंत जवळपास २५ लोकांना ही शिक्षा झाली आहे. तसेच याविषयी आमच्याकडे कुणीही तक्रार केलेली नाही.