पुण्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत १२५ दुचाकींची रॅली

  • १५० ते २०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद

  • कोरोनाकाळात गुंडांसाठी विशेष सवलत आहे का ? – नागरिकांचा संतप्त प्रश्‍न

  • दळणवळण बंदी असतांना पुणे शहरात १०० ते १२५ दुचाकींच्या रॅलीमध्ये गुंडाची अंत्ययात्रा निघते, याचा अर्थ गुंडांना कायद्याचे भय राहिले नाही.
  • भर दुपारी आणि शहरात रॅलीमध्ये २०० हून अधिकजण सहभागी असतांनाही पोलिसांकडून त्यांना अटकाव न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्यास चूक ते काय ?

पुणे, १७ मे – कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत १५ मे या दिवशी दुपारी पुणे शहरातील बालाजीनगर ते कात्रज स्मशानभूमी या दरम्यान हत्या झालेल्या धनकवडी येथील सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याच्या अंत्ययात्रेत २०० हून अधिक साथीदारांनी अनुमाने १०० ते १२५ दुचाकींची रॅली काढली. यात अनेक जण मास्क न लावताच सहभागी झाले होते. याविषयी उपनिरीक्षक हरिश्‍चंद्र केंजळे यांनी तक्रार दिली आहे. नेहमीप्रमाणे सर्व घटना घडल्यानंतर, त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सहकारनगर पोलिसांकडून २०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर आता संबंधित सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

गुंडांसाठी कोरोना काळात शहराची शांतता भंग करणे, अवैध जमाव जमवणे, दहशत निर्माण करणे, यासाठी विशेष सवलत आहे काय ?, असा संतप्त प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर वाघाटे याच्या अंत्ययात्रेसाठी केवळ २५ लोकांना अनुमती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना कह्यात घेण्यात आले आहे.