गुरु आणि श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर साधक पती लाभून भावपूर्ण वातावरणात विवाह सोहळा पार पडल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

प्रतिकात्मक छायाचित्र
‘विवाह प्रारब्धानुसारच होतो’, असे शास्त्र सांगते. त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. साधिकेने व्यक्त केलेले विचार भावपूर्ण आणि प्रत्यक्ष चित्र डोळ्यांसमोर उभे करणारे आहेत. दोघांची साधनेत उत्तरोत्तर अशीच जलद गतीने प्रगती होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. वडिलांचा साधनेला तीव्र विरोध असल्याने त्यांनी साधना करणार्‍या पत्नीला अन् मुलीला आर्थिक साहाय्य न करणे आणि त्यांना त्रास देणे

‘मी आणि माझी आई, आम्ही दोघी साधना करतो. वडिलांचा पूर्वीपासूनच साधनेला तीव्र विरोध आहे. ते मोठा व्यवसाय करतात; पण गेल्या १० ते १२ वर्षांपासून आम्हा दोघींना कोणतेही आर्थिक साहाय्य करत नव्हते. ‘तुम्ही सनातनचे करता, तर तुम्हाला जे काही लागेल ते सनातनकडे जाऊन मागा. मी तुम्हाला काहीच देणार नाही’, असे ते म्हणायचे. आम्हा दोघींना जमेल तितका त्रास देणे, आमच्यावर संशय घेऊन बोलणे, असे ते करायचे.

२. मुलीच्या लग्नासाठी स्थळे सांगून येऊ लागल्यावर वडिलांनी तिला पुष्कळ बोलणे, त्यांनी आईला मारायला धावणे आणि मुलीने ‘माझ्याशी विवाह करणारा मुलगा तुमच्या धनसंपत्तीकडे पाहून नव्हे, तर माझ्यातील कलागुण पाहून लग्न करील’, असे ठामपणे सांगणे

मी मोठी झाल्यावर माझ्यासाठी स्थळे सांगून येऊ लागली. वडील मला म्हणू लागले, ‘‘लग्न कर.’’ एके दिवशी ते आम्हा दोघींना पुष्कळ बोलले. ते आईला मारायला आले. ते मला म्हणाले, ‘‘मी तुझ्या लग्नासाठीच कष्ट करत आहे आणि मला तुझी चिंता आहे.’’ त्यावर मी त्यांना ठामपणे सांगितले, ‘‘तुम्ही मुळीच चिंता करू नका. जो मुलगा माझ्याशी विवाह करील, तो तुमच्या धनसंपत्तीकडे पाहून लग्न करणार नाही. तो माझ्यातील कलागुण पाहून माझ्याशी लग्न करील. त्यामुळे तुम्ही आता भांडू नका.’’

३. आईच्या मार्गदर्शनामुळे श्रद्धा दृढ होणे, परात्पर गुरुदेवांना ‘तुझा भक्त असणार्‍या व्यक्तीशी मला लग्न करायचे आहे’, असे आत्मनिवेदन करणे आणि श्रीकृष्णाला ‘मला तुझ्या सगुण रूपाशीच विवाह करायचा आहे’, असे सांगणे

हा प्रसंग घडल्यानंतर मला मधूनच केव्हातरी या विषयाचा ताण यायचा. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव आहेत. तेच काळजी घेतील. तू ताण घेऊ नकोस’, असे आई मला सांगायची. तिच्या मार्गदर्शनामुळे माझी श्रद्धा दृढ होत गेली आणि माझे परात्पर  गुरुदेवांना आत्मनिवेदन करण्याचे प्रमाण वाढले. आत्मनिवेदन करतांना मी परात्पर गुरुदेवांना सांगायचे, ‘गुरूंवर श्रद्धा असणे, हेच सर्वांत मोठे धन आहे’, असे मला वाटते. ‘गाडी, स्वतःचे घर किंवा धन-संपत्ती असावी’, अशी माझी इच्छा नाही. हे काही नसले, तरी चालेल; पण देवा, तुझा भक्त असणार्‍या व्यक्तीशी मला लग्न करायचे आहे.’

मनाची स्थिती बिघडली की, मी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचे आणि त्याला म्हणायचे, ‘मला तुझ्या सगुण रूपाशीच विवाह करायचा आहे. मी अन्य कुणाशीही विवाह करणार नाही. तूच माझ्यासाठी सगुणात ये.’

४. लग्नाविषयी लोकांनी बोलल्यावर आईने धीर देणे आणि आईचे बोलणे ऐकून निराशा दूर होणे

लग्नासाठी सर्व विषय अंतिम होऊ लागला आणि अकस्मात् देवानेच ते आपोआप रहित केले. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, अशी माझ्या मनाची निश्चिती व्हायची. माझी श्रद्धा टिकून रहाण्यासाठी आई मला पुष्कळ मोलाचे मार्गदर्शन करायची. ‘तूच लेकीला लाडावून ठेवले आहेस. तिचे लग्न करत नाहीस’, असे सर्व जण तिला म्हणायचे. त्यावर ती ते स्वीकारायची आणि मला म्हणायची, ‘‘तू लक्ष देऊ नकोस. मला कुणी काहीही बोलले, तरी मी स्वीकारीन. तू त्रास करून घेऊ नकोस. परात्पर गुरुदेव योग्य वेळी तुझे लग्न करतील आणि नाही झाले, तरी मला चालेल. आपण धर्मकार्य करू.’’ आईचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ आधार वाटायचा आणि माझी निराशा दूर व्हायची.

५. नवरात्रीच्या कालावधीत देवीला प्रार्थना करून आत्मनिवेदन करतांना एका साधकाचे नाव डोळ्यांसमोर दिसणे आणि त्याला विचारल्यावर त्याने लग्नाला होकार देणे

नवरात्रीच्या कालावधीत माझ्याकडून देवीलाच प्रार्थना होत होती, ‘आई, तूच तुझ्या भक्ताशी माझे लग्न लावून दे. परात्पर गुरुदेव माझे पिता आहेत.’ वर्ष २०१७ मधील नवरात्र चालू होते. ‘दिवाळी झाल्यावर माझ्या लग्नाचा विषय चालू होणार’, अशी घरातील स्थिती होती. मी नामजप करण्यासाठी बसल्यावर देवाला आत्मनिवेदन केले. त्या वेळी एक नाव माझ्या डोळ्यांसमोर गोल फिरतांना दिसले; म्हणून ‘आपण हे स्थळ बघूया का ?’, असे मी आईला विचारले. त्यावर आई म्हणाली, ‘‘चालेल.’’ त्याप्रमाणे त्या साधकाला विचारले असता तो माझ्याशी विवाह करण्यास सिद्ध झाला. अशा पद्धतीने माझे लग्न ठरले.

६. एका ब्राह्मणाने पत्रिकेवरून हे लग्न न करण्यास सांगितल्याने घरच्यांचा विरोध वाढणे आणि एका संतांना विचारल्यावर त्यांनी चांगला निर्णय असल्याचे सांगितल्याने लग्न करण्याचा निर्णय घेणे

एका ब्राह्मणाने नातेवाइकांना सांगितले, ‘‘या मुलीची पत्रिका सैतानाची आहे. ही मुलगी चांगली नाही. तुम्ही हे लग्न करू नका.’’ त्यांचे बोलणे ऐकून आमच्या घरातील काही जणांचा या लग्नाला विरोध वाढला आणि त्यांनी ‘आम्हाला हे लग्न मान्य नाही. मुलाला आई-वडील आणि बहीण कुणी नाही’, अशी भूमिका घेतली. या विवाहाविषयी आम्ही एका संतांना विचारले असता त्यांनी ‘धर्मकार्य करण्यासाठी दोघेही एकमेकांना पूरक आहेत आणि पुष्कळ चांगला निर्णय आहे’, असे उत्तर दिले. आम्हा दोघांचेही मत होते, ‘‘आपले गुरु एकच आहेत, तर तेच आपली पत्रिका आणि तेच आपले जीवन आहेत. त्यामुळे या निर्णयाच्या पुढे जाऊया.’’ नंतर गुरुमाऊलीच्या कृपेने आम्ही घरून विरोध असतांनाही ‘विषय पुढे न्यायचा आणि लग्न करायचे’, असा निर्णय घेतला. हे सर्व घडत असतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता आणि ‘हे धर्म-अधर्माचे युद्ध आहे’, असे जाणवत होते.

७. ‘प.पू. गुरुदेवच पिता आहेत’, असे वाटणे आणि भगवंतावाचून साहाय्य करणारे कुणी नसूनही लग्नाची सिद्धता करतांना ‘भावसोहळ्याची सिद्धता करत आहोत’, असे वाटणे

घरी आध्यात्मिक त्रास आणि विरोध यांमुळे आई सोडून इतर कुणीही माझ्या लग्नाची सिद्धता करायला नव्हते. मला साहाय्य करणारे भगवंतावाचून अन्य कुणीच नव्हते. ‘परात्पर गुरुदेवच माझे पिता आहेत’, असे मला वाटायचे. अशी सर्व परिस्थिती असल्यामुळे लग्नाची सर्व सिद्धता मी, माझी आई आणि माझे भावी पती, अशा तिघांनी प.पू. गुरुदेवांना समवेत घेऊन करण्याचे ठरवले. वेळोवेळी परात्पर गुरुदेवच आम्हाला आतून सर्वकाही सुचवायचे आणि करवून घ्यायचे. स्वतःच्या लग्नाची सिद्धता करतांना ‘एका भावसोहळ्याची सिद्धता करत आहे’, असे मला वाटत होते.

८. लग्नासाठी कार्यालय शोधणे

८ अ. प्रार्थना केल्यावर देवाने एका तीर्थक्षेत्राचे नाव सुचवणे आणि तेथे जाऊन कार्यालय शोधतांना एका कार्यालयात गेल्यावर तेथे चांगली स्पंदने अन् चैतन्य जाणवल्याने लग्नासाठी तेच कार्यालय निश्चित करणे : लग्नासाठी कार्यालय (सभागृह) पहायला जायचे होते. त्या वेळी मी देवाला प्रार्थना केली, ‘देवा, हा लग्नसोहळा देवतांच्या उपस्थितीत पार पडेल, असे चैतन्यमय ठिकाण तूच आम्हाला शोधून दे.’ त्या वेळी देवाने मला एका तीर्थक्षेत्राचे ठिकाण सुचवले. तेथे जाऊन आम्ही कार्यालय शोधत असतांना आम्हाला एक कार्यालय दिसले. त्या कार्यालयात गेल्यावर आम्हाला तेथे पुष्कळ चांगली स्पंदने आणि चैतन्य जाणवले. ‘लग्न येथेच करायचे’, अशी आमची निश्चिती झाली. आम्ही त्यांना सोयी-सुविधांविषयी काहीही न विचारता प्रथम भाडे विचारले आणि ते कार्यालय आरक्षित केले. ‘ही कृती कशी झाली ?’, ते आम्हाला कळलेच नाही. कार्यालय आरक्षित करण्याचे कारण आम्ही तेथील व्यवस्थापक असलेल्या दादा आणि वहिनी यांना सांगितले.

८ आ. निश्चित केलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी एका संतांनी तपश्चर्या केलेली असल्याचे तेथील व्यवस्थापकांकडून समजणे : आमचे बोलणे ऐकून त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘ती जागा एका मोठ्या संतांची असून आम्ही दोघे त्या संतांचे शिष्य आहोत आणि सेवा म्हणून ती जागा सांभाळत आहोत. त्या भूमीत संतांनी अनेक वर्षे तपश्चर्या केलेली आहे. ते संत नित्यनेमाने पंढरपूरची वारी करत असत. त्या कार्यालयाच्या परिसरात त्या संतांच्या गादीवर बसलेले त्यांचे शिष्य आहेत. तेसुद्धा संत आहेत. तेथे त्यांचे वास्तव्य असते.’’

‘आम्ही आध्यात्मिक स्तरावर विवाह करणार आहोत’, असे सांगितल्यावर त्या उभयतांना पुष्कळ आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘ही जागा विश्वस्त मंडळाची आहे. गेल्या ५ वर्षांपासून येथे लग्नकार्ये केली जातात. येथे तुमचे लग्न होईल. त्यामुळे या कार्यालयाची शुद्धी होईल. आमचे भाग्य आहे की, तुमचे लग्न आमच्या कार्यालयात होणार आहे.’’ अशा प्रकारे आमच्या लग्नासाठी कार्यालय निश्चित झाले.  (क्रमशः उद्याच्या अंकात)

– एक साधिका

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.