नवीन घर घेतांना सायंकाळी थकूनभागून कार्यालयातून आल्यावर मनाला विरंगुळा देणारे, शांतता देणारे असावे असे आपल्याला वाटते. घराला रंग देतांना घरात आल्यावर प्रसन्न वाटले पाहिजे, अशा रंगाची निवड करावी. घराला सात्त्विक तसेच उत्साहवर्धक रंग द्यावा. फिकट पिवळा, गुलाबी, आकाशी, बदामी हे रंग सात्त्विक आहेत. पांढरा रंग हासुद्धा सात्त्विकतेच्या दृष्टीने चांगला आहे. पांढर्या रंगाच्या वास्तूकडे पाहिल्यावर पुष्कळ शांत आणि चांगले वाटते. असे असले, तरी अन्य रंग वापरायचे झाल्यास कोणत्या दिशेला कोणता रंग वापरू शकतो, याविषयी पुढील माहिती उपयुक्त ठरू शकेल.
घरासाठीच्या रंगांची दिशेनुसार निवड
रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाचा जन्मदिनांक या दोन निकषांवर आधारित असावी लागते. प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो; परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तूशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रंगांची निवड करावी. यात पुढील सूत्रे महत्त्वाची असतात.
- ईशान्य – फिकट निळा
- पूर्व – पांढरा किंवा फिकट निळा
- आग्नेय – या दिशेचा अग्नीशी संबंध असतो. त्यामुळे भगवा, गुलाबी किंवा चंदेरी रंग वापरून येथे ऊर्जा वाढवता येते.
- उत्तर – हिरवा किंवा पिस्ता
- वायव्य – या दिशेने वारे येतात. म्हणूनच या दिशेच्या खोल्यांचे रंग राखाडी आणि फिकट पिवळा(क्रीम) असलेले चांगले.
- पश्चिम – ही वरुणाची म्हणजेच पाण्याची दिशा. त्यामुळे या दिशेचे सर्वांत चांगले रंग म्हणजे निळा आणि पांढरा
- नैऋत्य – पीच, मातकट, ‘बिस्कीट’ किंवा हलका तपकिरी
- दक्षिण – लाल आणि पिवळा
लाल किंवा गुलाबी रंग निवडतांना काळजी घेतली पाहिजे. कारण हे रंग प्रत्येक व्यक्तीला पोषक नसतात.
(संदर्भ :‘ए टू झेड वास्तू डॉट कॉम’)